Shreyas Iyer World Record: भारताचा नवा टी-२० कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अद्वितीय कामगिरी केली आहे. श्रेयसने अशी कामगिरी जी आजवर जगातील महान कर्णधारांनाही साध्य करता आलेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेचा चौथा सामना ब्रिस्टलमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर श्रेयसने ८० धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला आहे.
भारतीय कर्णधार म्हणून श्रेयसने सलग सहाव्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांचा विक्रम त्याने मोडला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नसला, तरी त्याने आतापर्यंत एकही नाणेफेक गमावलेली नाही.
कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत नाणेफेक जिंकणारा श्रेयस अय्यर हा जगातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. ब्रिस्टल येथील ‘काउंटी ग्राउंड’वर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान श्रेयसने इतिहासात आपले नाव कोरलं. मात्र, नशिबाची ही साथ मिळूनही मैदानावर भारतीय संघाला अद्याप यश मिळालेलं नाही आणि अय्यर कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
३१ वर्षीय श्रेयस अय्यरने या बाबतीत पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शादाब खानला मागे टाकलं आहे. शादाब खानने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग पाच वेळा नाणेफेक जिंकली होती. ही कामगिरी आतापर्यंत एक जागतिक विक्रम म्हणून कायम होती. मात्र, ब्रिस्टल येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात श्रेयसने नाणेफेक जिंकताच हा विश्वविक्रम आपल्या नावे केला. कर्णधारपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सलग सहा वेळा नाणेफेक जिंकणारा श्रेयस अय्यर आता जगातील एकमेव कर्णधार ठरला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीसह, भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अय्यरने आपले स्थान अधिक बळकट केलं आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सलग सर्वाधिक वेळा नाणेफेक जिंकण्याचा विक्रम दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे; त्याने मे २०१० ते फेब्रुवारी २०१२ या कालावधीत सलग सात सामन्यांत नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो, ज्याने ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात सलग सहा वेळा नाणेफेक जिंकण्याचा पराक्रम केला होता.
श्रेयस अय्यरने आता सलग सहा टॉस जिंकण्याच्या कोहलीच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली असून, तो धोनीच्या सर्वकालीन विक्रमापासून केवळ एका पावलावर आहे. विशेष म्हणजे, या यादीत सध्याचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याचाही समावेश आहे; त्याने फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात सलग पाच टॉस जिंकले होते, तर धोनीनेही आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजेच सप्टेंबर २००७ मध्ये, सलग पाच टॉस जिंकले होते.
