भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर याने सामन्यातल्या दुसऱ्या डावात ६५ धावा करत उत्कृष्ट खेळी केली. त्याने सांगितलं की परिस्थिती पाहता त्याला जास्तीत जास्त वेळ खेळणं भाग होतं. त्याने पहिल्या डावात १०५ धावा करत शतक पूर्ण केलं तर दुसऱ्या डावात ६५ धावा करत अर्धशतकही केलं. अशा प्रकारची खेळी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

अय्यर म्हणाला, ‘मी भारतीय संघासाठी नाही तर माझ्या रणजी संघासाठी यापूर्वी अशा परिस्थितीत खेळलो आहे. मी फार पुढचा विचार करत नव्हतो, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊनच खेळत होतो.’

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला दुसऱ्या डावात जास्त वेळ फलंदाजी करण्यास सांगितले होते, असे त्याने उघड केले. अय्यर पुढे म्हणाला, ‘राहुल सरांनी मला जास्तीत जास्त चेंडू खेळायला सांगितले आणि मी तेच करण्याचा विचार केला. मला वाटते की आम्हाला २५० धावांची चांगली आघाडी मिळाली, ज्याचा मला आनंद आहे. माझे लक्ष अजूनही भारताने पहिली कसोटी जिंकण्यावर आहे आणि ते करण्यासाठी आम्हाला अद्याप नऊ विकेट्सची गरज आहे तर पाचव्या दिवशी न्यूझीलंडला २८० धावांची गरज आहे. भारतीय संघातील फिरकीपटूंचे त्रिकूट त्यांना सोमवारी विजय मिळवून देऊ शकते”.

हेही वाचा – भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका : श्रेयस-साहाने सावरले! ; अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी नऊ बळींची आवश्यकता

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणला यष्टिरक्षक केएस भरतच्या खेळाबद्दल प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खूप पूर्वी सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘वृद्धिमान साहानंतर केएस भरत हा एकमेव खेळाडू आहे जो कसोटीत भारतीय संघासाठी यष्टिरक्षकाची कमान सांभाळू शकतो.’ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघातील भारताचा दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत याला ग्रीन पार्क स्टेडियमवरील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी लागली कारण यष्टीरक्षक साहा मानेच्या समस्येमुळे मैदानात उतरू शकला नाही.

शनिवारी भरतने दोन झेल आणि एक स्टंपिंगसह चमकदार कामगिरी केल्याने भारताने न्यूझीलंडला २९६ धावांवर रोखले आणि ४९ धावांची आघाडी घेतली. लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, ‘मला अजूनही आठवते की राहुल द्रविड केएस भरतच्या विकेटकीपिंगबद्दल सांगायचा. त्याने मला सांगितले की भारतीय संघात ऋद्धिमान साहा नंतर, भरतकडे यष्टिरक्षणाचे कौशल्य आहे.

लक्ष्मण म्हणाले की, निवडकर्ते आणि प्रशिक्षक द्रविड यांनी टाकलेला विश्वास भरतने पूर्ण केला आहे. ते म्हणाले, “मला वाटते की निवडकर्ते आणि प्रशिक्षक यांनी घेतलेल्या निर्णयाला भरतने योग्य ठरवले आहे. यष्टिरक्षक-फलंदाजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असून त्याने ७८ सामन्यांमध्ये ४,२८३ धावा केल्या आहेत, ज्यात नऊ शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.