आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’द्वारे मिळालेल्या पैशातून एस. श्रीशांतने मुंबईतून एकाच दिवशी एक लाख ९५ हजार रुपयांचे कपडे खरेदी केले आणि एका मैत्रिणीला महागडा स्मार्टफोनसुद्धा भेट म्हणून दिला. श्रीशांतबाबतचा हा खुलासा दिल्ली पोलिसांनी मंगळवारी केला.
माजी रणजीपटू बाबूराव यादवला सोमवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली आणि अजित चंडिलाशी त्याच्या असलेल्या संबंधांची चौकशी केली. ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक झाली आहे. हरयाणाहून सोमवारी चंडिलाच्या नातेवाईकाकडून पोलिसांनी २० लाख रुपये हस्तगत केले होते. याचप्रमाणे मुंबईतून श्रीशांतने दोन लाखांचे कपडे आणि मैत्रिणीला भेट देण्यासाठी ४२ हजार रुपये किंमतीचा ब्लॅकबेरी झेड-टेन हा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीशांतने या सर्व गोष्टींचे रोखीने पैसे चुकते केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी १८ आरोपींपैकी नऊ जणांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. यात श्रीशांत, अंकित चव्हाण आणि चंडिलाचा समावेश आहे. या तीन खेळाडूंच्या हस्ताक्षराचे नमुनेसुद्धा घेतले जाणार आहेत.
आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १८ खेळाडू आणि बुकींविरोधात राजस्थान रॉयल्सने दिल्ली पोलिसांमध्ये औपचारिक तक्रार नोंदवल्यानंतर भारतीय दंड विधेयकाचे कलम ४०९सुद्धा लावण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीशांतला चौकशीसाठी सोमवारी सायंकाळी जयपूरला नेण्यात आले होते आणि मंगळवारी त्याला पुन्हा दिल्लीत आणून न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.