वृत्तसंस्था, कोलकाता
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी गोलंदाजांची निवड करताना आमच्यासमोर पेच असल्याचे भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने कबूल केले. अक्षर पटेलच्या रूपात अतिरिक्त अष्टपैलूला खेळवायचे की चायनामन कुलदीप यादवच्या कलात्मक फिरकीला प्राधान्य द्यायचे, हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न असल्याचे गिलने पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला (गुरुवारी) सांगितले.
भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरचे फलंदाजीत योगदान देऊ शकणाऱ्या गोलंदाजांना प्राधान्य असते. या स्थितीत अक्षर पटेलचे पारडे जड असू शकते. मात्र, चायनामन फिरकीपटू कुलदीपने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत (चार डावांत १२ बळी) चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला त्याच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. सामन्याच्या दिवशीच आम्ही अंतिम निर्णय घेऊ असे गिलने स्पष्ट केले.
‘‘देशातील क्रिकेट हंगामाला सुरुवात होऊन आता काहीच दिवस झाले आहेत. अशा वेळी कसोटी सामन्यात अतिरिक्त अष्टपैलू खेळवायचा की अतिरिक्त फिरकीपटू, हा पेच असतोच. आम्ही सकाळी पुन्हा एकदा खेळपट्टी पाहू आणि अंतिम निर्णय घेऊ. सामना जिंकण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करू,’’ असे गिल म्हणाला.
‘‘आम्ही अंतिम ११ खेळाडू जवळपास निश्चित केले आहेत. मात्र, तरी सामन्याच्या दिवशी खेळपट्टी पाहिल्यानंतर आम्हाला योजनेत बदलही करावा लागू शकेल. याचे कारण म्हणजे गेले दोन दिवस आम्ही खेळपट्टीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. दोन दिवसांत खेळपट्टीचे स्वरूप काहीअंशी बदलले आहे. भारतातील कसोटीत दिवसाच्या सुरुवातीला आणि अखेरच्या सत्रात वेगवान गोलंदाजांना मदत मिळले. मात्र, तिसऱ्या दिवसापासून फिरकीपटू अधिक सरस ठरतात. या सर्व गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागेल,’’ असे गिलने नमूद केले.
आमच्याकडे अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा असे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. फिरकी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विशेषत: भारतातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. असे पर्याय उपलब्ध असणे हे आमचे भाग्यच आहे. आम्ही खेळपट्टी पाहून योग्य त्या खेळाडूंची निवड करू. – शुभमन गिल, भारताचा कर्णधार.
