पीटीआय, इंदूर

न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिकेतही पराभव पत्करावा लागणे हे अपयश निश्चितच बोचणारे आहे. फलंदाजांची कामगिरी, फलंदाजीमधील दृष्टिकोन या दोन संघांतील मुख्य फरक होता, अशी कबुली भारताचा कर्णधार शुभमन गिल याने दिली.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गिलने दोन्ही संघांमध्ये जाणवलेल्या फरकाविषयी भाष्य केले. ‘‘आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, असे नाही. तर आमच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. विशेषत: मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात किमान दोन फलंदाजांकडून मोठी खेळी होणे गरजेचे होते. आम्ही त्यातच कमी पडलो,’’ असे गिल म्हणाला.

संपूर्ण मालिकेत न्यूझीलंड आणि भारतीय संघांच्या फलंदाजांच्या दृष्टिकोनातील फरकच निर्णायक होता याकडे गिल वारंवार लक्ष वेधत होता. ‘‘जेव्हा जेव्हा जम बसला, तेव्हा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभी केली. आमचे फलंदाज मात्र खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करू शकले नाहीत. फलंदाजीच्या आघाडीवर आम्हाला निश्चितपणे सुधारणा करावी लागेल,’’ असे गिलने सांगितले.

रणजी स्पर्धेत सहभाग

रवींद्र जडेजाची कामगिरी खालावल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर गिलने त्याला सावरून घेतले. ‘‘केवळ जडेजाच नाही, तर आमच्यापैकी एकही फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करू शकला नाही. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीचा तुम्ही फायदा करून घेणे आवश्यक असते, अन्यथा तुम्ही कायमच पिछाडीवर राहता. गोलंदाजीबाबत म्हणाल, तर जडेजाने संघासाठी अनेकदा महत्त्वपूर्ण बळी मिळवून आपले योगदान दिले आहे. मात्र अशी एखादी मालिका असते, की ज्यात तुम्ही अपेक्षित कामगिरी करू शकत नाही,’’ असे म्हणत गिलने जडेजाची पाठराखण केली.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर विश्रांती घेण्यापेक्षा शुभमन गिलने रणजी सामन्यात सहभाग नोंदविण्यास पसंती दिली आहे. रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून सुरुवात होणार असून यावेळी सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात गिल पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘‘एकदिवसीय मालिकेनंतर शुभमनने विश्रांती घेणे टाळले आहे. तो पंजाबकडून रणजी सामना खेळणार आहे. इंदूरहून राजकोटसाठी थेट विमानसेवा नसल्याने त्याला आठ तास प्रवास करावा लागला,’’ असे पंजाब संघाच्या जवळील सूत्राकडून सांगण्यात आले. पंजाब संघाचे पाच सामन्यांत केवळ ११ गुण आहेत. त्यामुळे बाद फेरी गाठायची झाल्यास पंजाबला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील.

हर्षितची कामगिरी मोलाची

मालिकेतील सकारात्मक बाबींवर लक्ष टाकताना गिलने हर्षित राणाच्या फलंदाजीचे कौतुक केले. ‘‘तळाच्या फळीत हर्षितच्या कामगिरीने एका नव्या अष्टपैलू खेळाडूचा उदय झाला. आठव्या क्रमांकावरील फलंदाजाची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरते. आम्हाला या क्रमांकावर अशा खेळाडूंना संधी द्यायची आहे, की जे फलंदाजीची खोली मजबूत करू शकतात. हर्षितने ती आशा पल्लवित केली आहे,’’ असे गिलने आवर्जुन सांगितले.

क्षेत्ररक्षणात सुधारणा आवश्यक

गिलने क्षेत्ररक्षणातील चुकांचाही भारताला फटका बसल्याचे मान्य केले. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर गोलंदाज प्रयत्नपूर्वक संधी निर्माण करत असतात. अशा वेळी त्यांना क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळणे अपेक्षित असते. क्षेत्ररक्षकांनी झेल सोडल्याचा फटका आम्हाला बसला. कुणीही जाणुनबुजून झेल सोडत नसतो. परंतु हे असे क्षेत्र आहे जेथे आम्हाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणात वारंवार चुका करणे योग्य नाही, असेही गिल म्हणाला.