Shubman Gill Befitting Reply to British Journalist Video: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध एजबेस्टन कसोटी सामना जिंकत इतिहास घडवला. भारतीय संघाने ५८ वर्षांत पहिल्यांदाच एजबेस्टन बर्मिंगहममध्ये कसोटी सामना जिंकला. भारत १९६७ पासून या मैदानावर खेळत आहे पण कधीही कसोटी जिंकू शकला नव्हता. त्यामुळे भारताचा रेकॉर्ड पाहता भारतासाठी हा सामना जिंकणं खूप कठीण होतं. पण शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने करून दाखवलं. इंग्लंडला ३३६ धावांनी पराभूत केल्यानंतर, गिलने एका ब्रिटिश पत्रकाराची खिल्ली उडवली, ज्याने सामन्यापूर्वी भारताच्या या मैदानावरील रेकॉर्डबद्दल टोमणे मारले होते.

भारताने बर्मिंगहमममध्ये कधीच कसोटी सामना जिंकला नव्हता, त्यामुळे सामन्यापूर्वी त्याच अनुषंगाने कर्णधार गिलला प्रश्न विचारण्यात आले आहेत. पण सामन्यातील भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर गिलने या प्रश्नांचं व्याजासकट उत्तर दिलं. भारताच्या रेकॉर्डबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची गिलने आठवण काढली. पत्रकार परिषदेत गिलने त्या पत्रकाराची आठवण काढली, त्यानंतर एकच हशा पिकला. या कसोटीपूर्वी एजबॅस्टनमध्ये भारताने आठपैकी सात सामने गमावले होते.

एजबॅस्टन कसोटी सुरू होण्यापूर्वी, एका ब्रिटिश पत्रकाराने शुबमन गिलला प्रश्न विचारला होता की भारत या मैदानावर कधीही जिंकला नाहीये. तेव्हा भारतीय कर्णधाराने संयमाने उत्तर देत सांगितलं की त्याला माहित नाही की यापूर्वी काय घडलं. पण सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम आहे.

आता भारताने कसोटी सामना जिंकल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना गिल एका प्रश्नाचं उत्तर देताना त्या पत्रकाराची आठवण काढली आणि म्हणाला, “माझा आवडता पत्रकार कुठे दिसत नाहीये. कुठे आहेत ते. मला खरंच त्यांना भेटायची इच्छा आहे. मी या कसोटी सामन्यापूर्वीच सांगितलं मी आकडे किंवा यापूर्वी काय घडलं यावर विश्वास ठेवत नाही. गेल्या ५०-६० वर्षांमध्ये इथे अनेक भारतीय संघ येऊन खेळले. पण यावेळचा भारतीय संघ सर्वाेत्तम आहे. आमच्यात त्यांना पराभूत करण्याची क्षमता आहे. जर आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आणि असंच खेळत राहिलो तर ही मालिका कायम सर्वांच्या लक्षात राहण्यासारखी असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एजबॅस्टन कसोटीत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघ २७१ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून आकाश दीपने सहा विकेट्स घेतल्या. शुबमनने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात द्विशतक झळकावत २६९ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने शतकी खेळी करत संघांच्या धावांमध्ये महत्त्वपू्र्ण योगदान दिले.