Shubman Gill Akaay Kohli Viral Reel: क्रिकेट विश्वात विराट कोहलीला किंग या नावाने संबोधलं जातं. विराटच्या उत्कृष्ट कामगिरीप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचा युवा खेळाडू शुबमन गिलने देखील चांगली कामगिरी करत आपलं नाव कमावलं. विराट कोहली किंग तर शुबमन गिलला प्रिन्स म्हणून चाहते संबोधतात. शुबमन गिलची कामगिरी पाहता विराट कोहलीप्रमाणे तोदेखील भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असं चाहते म्हणताना दिसतात. यादरम्यान आता एका व्हायरल रीलमध्ये शुबमन गिलला विराटचा लेक अकाय कोहलीचा काका म्हटलं असल्याची एक रील चांगलीच व्हायरल होत आहे. यावर शुबमन गिलने देखील कमेंट केली आहे.
शुबमन गिलला चक्क विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा मुलगा अकायचा ‘काका’ म्हटल्यानंतर सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल इन्स्टाग्राम रीलमध्ये एक मुलगी शाळेतील शिक्षक बनली आहे आणि तिने एका छोट्याशा चुकीसाठी अकायला त्याच्या प्रसिद्ध आई-वडिलांना शाळेत घेऊन येण्याची शिक्षा दिल्याचं दाखवण्यात आलं आहे. या रीलमध्ये त्या मुलीने आणखी एक मजेशीर ट्विस्ट देत अकायला त्याचा काकाला म्हणजेच शुबमन गिललाही शाळेत घेऊन येण्यास सांगितलं.
या रीलवर मी अकाय कोहलची शाळेतील शिक्षिका असं लिहिलं आहे. यानंतर वर्गात आवाज होताच, ती वर्गात विचारते, “कोण क्लासमध्ये आवाज करतंय” आणि त्यानंतर ती अकायकडे पाहून म्हणते… “अकाय…, तुझ्या पालकांना उद्या शाळेत घेऊन ये आणि आईबाबा दोघांनाही आण आणि हो तुझ्या काकांना पण सोबत घेऊन ये. कोणते काका म्हणजे, शुबमन गिल.” हे म्हणताच ती खूश होते. या रीलला तिने ‘किंग-प्रिन्स पगलू’ असं कॅप्शन दिलंय.
गमतीचा हा सिलसिला रीलपुरताच मर्यादित राहिला नाही. शुबमन गिलने स्वतः कमेंट करत या मजेशीर रीलमध्ये सहभाग घेतला. विराट कोहलीला टॅग करत गिलने लिहिलं, “भाई dw, I gotchu”, म्हणजेच ‘भाऊ, चिंता करू नकोस, मी आहे ना.’ गिलच्या या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया व मीम्सचा पाऊस पडला.
गिल आणि कोहली यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि खेळकर नात्याची आणखी एक झलक या मजेशीर संवादातून पाहायला मिळाली. ही रील केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली असली, तरी गिलच्या कमेंटमुळे हा क्षण चाहत्यांसाठी आणखी खास आणि मजेशीर ठरला.
