न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ मध्य प्रदेशातील इंदूर इथे दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच इंदूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने २३ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने हॉटेलातील खोलीत खास स्वरुपाचा वॉटर प्युरिफायर बसवल्याची चर्चा आहे. या वॉटर प्युरिफायरची किंमत ३ लाख रुपये असल्याने लोक चकित झाले आहेत. मात्र यासंदर्भात भारतीय संघव्यवस्थापन, मध्य प्रदेश क्रिकेट संघटना तसंच हॉटेल व्यवस्थापन यांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

तब्येतीबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नसलेल्या गिलने हॉटेलमधल्या खोलीत प्युरिफायर बसवल्याचं वृत्त समोर येत आहे. भारतीय संघ पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य करतो. तिथे पॅकेज्ड मिनरल वॉटरच दिलं जातं. मात्र शुबमन पाण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसंदर्भात धोका घेऊ इच्छित नाही.

सलग सात वर्ष देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर अशी बिरुदावली पटकावलेल्या इंदूरमध्ये डिसेंबर २०२५ च्या शेवटी आणि जानेवारी २०२६च्या सुरुवातीला इंदूरमधील भागीरथपुरा आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांना नळाचे पाणी प्यायल्यानंतर अचानक जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि तीव्र डिहायड्रेशन असा त्रास व्हायला लागला. अनेकांना आधीच्या काही दिवसांपासूनच नळाच्या पाण्याला वास येतो, कडू चव आहे किंवा रंग बदललेला आहे, हे जाणवत होते आणि त्यांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती; पण त्वरित पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी करून स्पष्ट केले की त्या भागातील पिण्याचे पाणी गटाराच्या पाण्याने दूषित झाले आहे आणि त्यामुळे पाण्यामार्फत पसरणाऱ्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला

भागीरथपुरामध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन एक सार्वजनिक शौचालय आणि गटाराच्या लाइनजवळून जात होती. ही पाइपलाइन तुटली आणि गळती सुरू झाली आणि तिच्यातील पाण्याचा दाब कमी झाला, तेव्हा आजूबाजूचे घाण पाणी (गटार) त्यात ओढले गेले आणि त्याच पाइपमधून शेकडो घरांपर्यंत पोहोचलं.

१४००हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ८जणांचाच मृत्यू झाल्याचं प्रशासनाने सांगितलं मात्र पाण्यात मोठ्या प्रमाणावर धोकादायक घटक असल्याने मृतांचा आकडा वाढला. या घटनेमुळे पाण्याचं व्यवस्थापन, सुरक्षा, देखरेख, नागरिकांचं आरोग्य हे सगळेच प्रश्न ऐरणीवर आले. आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्याने तातडीने काही बदल करण्यात आले. या परिसरातील पाणीपुरवठा स्थगित करण्यात आला. मलनिसारण आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन एकत्र येणार नाहीत याची तजवीज करण्यात आली. नागरिकांना शुद्ध पाण्याने स्वतंत्र यंत्रणेद्वारे पुरवण्यात आलं.

दरम्यान या दुर्घटनेला कारणीभूत झोन क्रमांक४च्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एका उपअभियंत्याला बडतर्फ करण्यात आलं आहे. सध्या या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, जुन्या आणि खराब झालेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

न्यूझीलंडचा संघ ३ वनडे आणि ५ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आहे. बडोदा इथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत मात्र पाहुण्यांनी भारताला ७ विकेट्सनी नमवलं. इंदूर इथे तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. होळकर मैदानावर हा सामना रंगणार आहे. या मैदानावर ७ वनडे सामने खेळवण्यात आले असून भारतीय संघाने निर्भेळ यश मिळवलं आहे.