आयपीएल २०२६ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने दमदार ९६ धावांची खेळी केली. राजस्थानचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात संघर्ष करताना दिसून येत होता. पण वैभवच्या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकात ६ गडी बाद २१४ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने ७ गडी राखून विजय मिळवला. यासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ २१५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला चांगल्या सुरुवातीची गरज होती. अशी सुरुवात साई सुदर्शन आणि शुबमन गिल या जोडीने करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १६७ धावा जोडल्या. साई सुदर्शनने ५८ धावा केल्या. तर शुबमन गिलने १०४ धावा केल्या. या दोघांनी मिळून गुजरातच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर १६ धावांवर बाद झाला. राहुल तेवतियाने नाबाद नाबाद १७ आणि बटलरने नाबाद ९ धावा करून गुजरातला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.

वैभव सूर्यवंशीची खेळी व्यर्थ या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. डावाची सुरुवात करताना यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजाने मिळून राजस्थानचा डाव सांभाळला. वैभवकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ९६ धावांवर बाद होऊन माघारी परतला. शेवटी रवींद्र जडेजाने नाबाद ४५ धावा केल्या. तर डोनोवन फरेराने नाबाद ३८ धावा करून संघाची धावसंख्या २१४ धावांवर पोहचवली.

गुजरातचा अंतिम फेरीत प्रवेश

गुजरात टायटन्सने या विजयासह आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत होणार आहे. हा सामना ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.