Shubman Gill Batting Technique: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका ही भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. या मालिकेआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम केलं. त्यामुळे कसोटी संघाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली. इंग्लंडमध्ये गिलचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही, त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी आणि फलंदाजी हे समीकरण जुळून येईल का? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले गेले होते. नेतृत्वाच्या जबाबदारीमुळे गिलवर दबाव येईल, असा अंदाज अनेक दिग्गज खेळाडूंना वर्तवला होता. पण गिलने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि इंग्लंडमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे.
याआधी इंग्लंडमध्ये खेळताना गिलला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेतील अंतिम सामन्यात तो पहिल्यांदा इंग्लंडमध्ये फलंदाजीसाठी उतरला होता. त्यानंतरही त्याला इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण तो एकाच चुकीमुळे नेहमी बाद होता. ती चूक म्हणजे बॅट आणि पॅड यांच्यात असलेला गॅप. जेव्हा चेंडू समोरचा चेंडू खेळण्यासाठी गिलची बॅट समोर यायची, त्यावेळी बॅट आणि पॅडमध्ये बराच गॅप असायचा. त्यामुळे वेगाने आत येणाऱ्या चेंडूवर तो बाद होऊन माघारी जात होता. यासह बॅट खूप उशिराने येत असल्यामुळे स्लीपमध्येही अनेकदा झेलबाद झाला होता.
मात्र आता त्याने आपल्या फलंदाजीत खूप मोठा बदल केला आहे. त्याच्या बॅट आणि पॅडमधील गॅप खूप कमी झाला आहे. यासह त्याला आपला ऑफ स्टंप कुठे आहे, याचा चांगलाच अंदाज आला आहे. त्यामुळे बाहेर जाणारे चेंडू तो योग्यरित्या सोडत आहे. यासह स्टंप लाईनमध्ये येणारे चेंडू तो सरळ बॅटने खेळत आहे. त्यामुळे चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. याआधी अनेकदा तो स्लिपमध्ये झेलबाद झाला आहे. मात्र, आता त्याला बाद कसं करायचं, असा प्रश्न इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर निर्माण झाला आहे.
इंग्लंडमध्ये गिलची दमदार फलंदाजी
या दौऱ्यावर गिलने दमदार फलंदाजी केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने दमदार शतकं झळकावलं होतं. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने २२७ चेंडूंचा सामना करत १४७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने ८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ३८७ चेंडूंचा सामना करत २६९ धावांची तुफानी खेळी केली. त्याचं त्रिशतक अवघ्या काही धावांनी हुकलं. आता दुसऱ्या डावातही त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे.