Shubman Gill Record: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. यासह मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. त्यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार पुनरागमन करत भारतीय संघावर विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन हवी तशी कामगिरी करू शकला नाही. या सामन्यात तो एक धाव करून माघारी परतला. तरीदेखील त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

शुबमन गिलची दमदार फलंदाजी

या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने १६७ च्या सरासरीने ३३४ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने २ दमदार शतकं झळकावली. ज्यामध्ये एक विक्रमी द्विशतकी खेळीचा समावेश होता. यासह तो ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. यासह गिल हा दुसराच कर्णधार बनला आहे, ज्याने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत फलंदाजी करताना ३०० हून अधिक धावा कुटल्या आहे.

याआधी झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरने वनडे क्रिकेटमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत फलंदाजी करताना ३०० धावांचा पल्ला गाठला होता. शुबमन गिलच्या आधी ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी होता. विराट कोहलीने २०१७ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मालिकेत फलंदाजी करताना २६३ धावा केल्या होत्या.

३ वनडे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार

शुबमन गिल (भारत) – ३३४ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२६)

ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे) – ३१० धावा विरुद्ध न्यूझीलंड (२०११)

शे होप (वेस्ट इंडिज) – २७८ धावा विरुद्ध भारत (२०२६)

बाबर आझम (पाकिस्तान)- २७६ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२१)

कुर्रम खान (यूएई) – २७० धावा विरुद्ध अफगाणिस्तान (२०१४)

भारतीय संघाचा पराभव

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकांअखेर ७ गडी बाद ३५१ धावा केल्या होत्या. यादरम्यान केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ९२ आणि ऋतुराज गायकवाडने ५७ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना शे होपने विक्रमी १६२ धावांची खेळी करून वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.