Shubman Gill Record with Historic IPL Hundred: आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये, गुजरात टायटन्ससाठी सर्वात मोठ्या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने महत्त्वपूर्ण खेळी साकारली. शुबमन गिलने चौकार-षटकारांसह अशी फटकेबाजी केली की त्याने शतकी खेळी साकारत अनेक विक्रम मोडले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५३ चेंडूंमध्ये १०४ धावांची स्फोटक खेळी करून, गिलने गुजरातला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं. यादरम्यान त्याने आजवर कोणीही न केलेला विक्रम आपल्या नावे केला आहे.
न्यू चंदीगड येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७ गडी राखून पराभूत करत आयपीएल २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो कर्णधार शुबमन गिल होता, ज्याने ५३ चेंडूंमध्ये १०४ धावांची शानदार खेळी साकारली. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवं शतक होतं. २१५ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गिलने साई सुदर्शनसोबत पहिल्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी करून राजस्थानच्या गोलंदाजांना पूर्णपणे हतबल केलं. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सुदर्शनने ५८ धावांचे योगदान दिले.
शुबमन गिलने इतिहास घडवला, IPLमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
या शतकासह, शुबमन गिल आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये एकापेक्षा जास्त शतकं झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, त्याने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल २०२३ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १२९ धावा केल्या होत्या. ती खेळी आजही आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणून कायम आहे.
गिलने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केलं, जे आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठरलं आहे. त्याने रजत पाटीदारचा विक्रम मोडला, ज्याने २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ४९ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. शुबमन गिल हा आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने प्लेऑफ टप्प्यात कर्णधाराने केलेल्या सर्वोच्च खेळीचा विक्रमही मोडला, जो यापूर्वी डेव्हिड वॉर्नर आणि रजत पाटीदार यांच्या नावावर होता.
गिलने विक्रमांची लावली रांग
गिल आता आयपीएलच्या इतिहासात पाच शतकं झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या २६ वर्षांपर्यंत कोणत्याही फलंदाजाने तीनपेक्षा जास्त आयपीएल शतकं केली नव्हती, पण गिलने हा आकडा पाचवर नेला आहे. शुबमन गिल या हंगामात ७०० धावा पूर्ण करणारा सर्वात तरुण कर्णधारही ठरला आहे. तो आयपीएलच्या एका हंगामात ७०० धावा करणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू देखील आहे, त्याच्या पुढे फक्त त्याचा सहकारी साई सुदर्शन आहे.
आयपीएल प्लेऑफमध्ये ५०० हून अधिक धावा करणारा गिल हा पहिला सलामीवीर ठरला आहे. प्लेऑफमधील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो आता ७१४ धावा करणाऱ्या सुरेश रैनाच्या पुढे आहे. गिलने आता ५८१ धावा करून महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत दुसरे स्थान पटकावलं आहे.
