Shubman Gill Double Century: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल इंग्लंडमध्ये चांगलाच गरजला आहे. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या कर्णधाराने दमदार द्विशतकी खेळी केली आहे. यासह तो इंग्लंडमध्ये द्विशतकी खेळी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कुठल्याही भारतीय कर्णधाराला इंग्लंडमध्ये द्विशतकी खेळी करता आलेली नाही.

भारताचा कर्णधार शुबमन गिल हा परदेशात (इंग्लंड, दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड) द्विशतकी खेळी करणारा आशियातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधी आशियातील कुठल्याही कर्णधाराला परदेशात फलंदाजी करताना द्विशतकी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे गिलने बर्मिंघममघ्ये इतिहासाला गवसणी घातली आहे.

शुबमन गिल – २०० धावा, बर्मिंघम, २०२५
तिलकरत्ने दिलशान- १९३ धावा, लॉर्ड्स, २०११
मोहम्मद अझरूद्दीन- १९२ धावा, ऑकलँड, १९९०
हनिफ मोहम्मद – १८७ धावा, लॉर्ड्स, १९६७
मोहम्मद अझरूद्दीन- १७९ धावा, मँचेस्टर, १९९०

यासह शुबमन गिलच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. शुबमन गिल हा इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कुठल्याही भारतीय कर्णधाराला इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना २०० धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. याआधी हा रेकॉर्ड भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नावावर होता. मोहम्मद अझरूद्दीन यांनी १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर फलंदाजी करताना १७९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी हा रेकॉर्ड करणारे ते पहिलेच भारतीय कर्णधार ठरले होते. आता गिलने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. १८० धावांचा पल्ला गाठताच गिल हा इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाच्या ५०० धावा पूर्ण

शुबमन गिलच्या विक्रमी द्विशतकी खेळीसह भारतीय संघाने बर्मिंघम कसोटीतील पहिल्या डावात ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने ८७ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ८९ धावा केल्या. यादरम्यान गिलने दुहेरी शतक झळकावलं. यासह भारताने पहिल्या डावात ५०० धावांचा पल्ला गाठला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.