‘बाबांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे आज मी इथवर पोहोचलो आहे. कुर्ता पायजम्याबाबत बोलायचं तर, बाबांना असं वाटतं की त्यांनी कुर्ता पायजमा घातला की आम्ही जिंकतो किंवा मी धावा करतो. त्यामुळे ते तिकडे जातात तिथे कुर्ता पायजमा घालतात’, असं गिलने सांगितलं. शेर ए पंजाब टी२० लीगच्या उद्धाटनप्रसंगी गिल बोलत होता.
‘मी भारतासाठी क्रिकेट खेळावं हे बाबांचं स्वप्न होतं. आम्ही आमच्या गावात क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. आजूबाजूच्या गावातली मुलं तिथे येऊन खेळू शकतात, सराव करू शकतात. बाबांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते अकादमीतली मुलं कसं खेळतात ते पाहायला जातात. तिथून आल्यावर मला सांगतात, याची बॅटिंग बघ. हा मुलगा चांगली बॉलिंग करतो, याची बॉलिंग बघून घे असं ते मला सांगतात. एखाद्याची फिल्डिंग त्यांना प्रभावित करते. ही मुलं अगदी सहा सात वर्षांची आहेत पण अतिशय उत्तम खेळतात’, असं शुबमनने सांगितलं.,
गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. गिलकडे भारताच्या टेस्ट आणि वनडे संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. गिलने ४१ टेस्ट, ६७ वनडे आणि ३६ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कोलकाता आणि गुजरात संघांसाठी तो आयपीएल खेळला आहे. आयपीएल स्पर्धेत तो गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आहे. आयपीएल स्पर्धेत १३४ सामन्यात त्याच्या नावावर ४५९८ धावा आहेत.
