Shubman Gill Abhishek Sharma clash in Sher-e-Punjab T20 match: शेर-ए-पंजाब टी-२० लीगमध्ये भारतीय संघाचे खेळाडू खेळत आहेत. या टी-२० लीगमध्ये प्रत्येक सामना रोमांचक होत आहे आणि स्पर्धेतील १७ वा सामनाही त्याला अपवाद नव्हता. हा सामना ‘फाझिल्का फाल्कन्स’ आणि ‘अमृतसर सुरमा’ यांच्यात खेळला गेला. भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा हे या सामन्यातील मुख्य आकर्षण होते. शुबमन गिल व अभिषेक शर्मा या सामन्यात एकमेकांसमोर होते

अमृतसर सुरमाविरुद्धच्या या सामन्यात सलामीला उतरलेल्या शुबमनने धडाकेबाज खेळी केली. गिलने या सामन्यात २५ चेंडूत अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या आक्रमक फलंदाजीसमोर अमृतसर सुरमाचे गोलंदाज हतबल झाले. अखेरीस अभिषेक शर्माने गोलंदाजीची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला, पण शुबमनने त्यालाही सोडलं नाही. १० व्या षटकात अभिषेकचा सामना करताना शुबमनने पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि एक चौकार लगावला आणि आपला कमालीचा फॉर्म कायम ठेवला. मात्र त्यानंतर जे घडलं ते खरोखरच पाहण्यासारखं होतं.

अभिषेक शर्मा vs शुबमन गिल

शुबमन गिल व अभिषेक शर्मा दोघेही पंजाबचे आहेत. दोघेही पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतात. याचबरोबर दोघेही एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगकडे दोघांनीही क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे या सामन्यात हे दोघे आमनेसामने आल्यावर कोण बाजी मारणार आणि कसं चित्र असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.

शुबमनने अभिषेक शर्माच्या पहिल्या तीन चेंडूंवर १६ धावा केल्या. त्याला या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता, परंतु तसं करण्याच्या प्रयत्नात तो बाउंड्रीजवळ झेलबाद झाला. यासह, पहिल्या तीन चेंडूंवर चांगलीच धुलाई झाल्यानंतर, अभिषेकने षटक संपण्यापूर्वी सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. अखेरीस, ३५ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६७ धावा काढून शुबमन गिल बाद झाला. गिलला बाद केल्यानंतर अभिषेक शर्माचा जल्लोष आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

या सामन्यात अमृतसर सुरमा संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या बळावर फाजिल्का संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १९१ धावा केल्या. शुबमनव्यतिरिक्त प्रांशू प्रताप आणि सान्वीर सिंग यांनीही प्रत्येकी ४० धावांचे योगदान दिले. अमृतसरच्या गोलंदाजांपैकी आकाश पांडे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केलं, तर नमन धीर आणि साहिल खान यांनी प्रत्येकी एक गडी टिपला.

फाझिल्का संघाने दिलेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, अमृतसर सुरमा संघाने ३ चेंडू शिल्लक असताना ६ गडी गमावून १९५ धावा करत सामना जिंकला. अमृतसरतर्फे अभिषेक शर्माने केवळ १५ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४९ धावांची आक्रमक खेळी केली. याव्यतिरिक्त, राहुल कुमारने ३५ चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या. फाझिल्काकडून गोलंदाजी करताना गर्व कुमार आणि रघु शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.