BCCI Naman Awards 2026: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुन्हा एकदा त्यांचा वार्षिक पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. नमन पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणारा हा कार्यक्रम यावेळी मुंबईऐवजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता, जिथे गेल्या वर्षभरात विविध ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या पाच भारतीय संघांना सन्मानित करण्यात आलं. याशिवाय तीन खेळाडूंना जीवनगौरव पुरस्कार तर अनेक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार मिळाले. पण या अवॉर्ड सोहळ्यात बीसीसीआयकडून दोन मोठ्या चूका झाल्या.
स्मृती मानधना व शुबमन गिल हे दोघेही सर्वाेत्कृष्ट महिला व पुरूष क्रिकेटपटू ठरले. तर माजी खेळाडू रॉजर बिन्नी, राहुल द्रविड आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांनी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय भारतीय संघाच्या ५ विविध विश्वचषक विजेत्या संघाचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अंडर-१९ महिला विश्वचषक, अंडर-१९ पुरूष विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, महिला वनडे विश्वचषक २०२५ आणि टी-२० विश्वचषक २०२६ विजेत्या भारतीय संघांचा समावेश होता.
जेव्हा २०२५ च्या १९ वर्षांखालील महिला विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं, तेव्हा स्टेजच्या मागे स्क्रीनवर चुकीचा फोटो दाखवण्यात आला होता. १९ वर्षांखालील महिला संघाऐवजी, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ महिला संघाचा फोटो दाखवण्यात आला होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा फोटो आयोजकांनी दुर्लक्षित केला आणि त्यात सुधारणा केली नाही. परिणामी, संपूर्ण १९ वर्षांखालील संघासाठी तोच फोटो स्टेजवरच राहिला.
यानंतर आणखी एक मोठी चूक झाली, ज्यामुळे बरेचसे चाहते संतापले. खेळाडू आणि कर्णधारांचा सन्मान करताना, विजेत्या वरिष्ठ संघांच्या कर्णधारांशी चर्चासत्र झालं. महिला विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर आणि टी-२० विश्वचषक विजेत्या कर्णधार सूर्यकुमार यादव देखील उपस्थित होत्या. तर, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार रोहित शर्मा या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हता, त्यामुळे उपकर्णधार शुबमन गिलने चर्चेची सूत्रं सांभाळली. पण इथेच मोठा घोळ झाला.
शुबमन गिल जेव्हा प्रश्नाचं उत्तर देत असताना त्याचं खाली स्क्रिनवर दिसलं. शुबमन गिलच्या नावापुढे “चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार” असं लिहिलं होतं. या चुकीमुळे अनेक चाहते संतापले, विशेषतः रोहित शर्माच्या चाहत्या वर्गाने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. जेव्हा बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हादेखील हिच चूक कायम राहिली. अखेरीस चाहत्यांच्या प्रतिक्रियेनंतर, बीसीसीआयच्या मीडिया टीमने ही चूक सुधारली.
