Shubman Gill Stunner Catch IND vs SL Galle Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा संघ सामन्यात एक पाऊल पुढे आहे. भारताने पहिल्या डावात ४६२ धावांचा डोंगर उभारला आहे. याशिवाय गोलंदाजीतही भारताने दणक्यात सुरूवात करत पहिल्याच सत्रात आतापर्यंत ४ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्या कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शुबमन गिलने टिपलेल्या झेलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने टिपलेल्या या झेलचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भारतीय संघ ४६२ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा धुव्वा उडवला. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर मानव सुथारने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये २ विकेट्स घेत श्रीलंकेला धक्के दिले. त्यानंतर कुलदीप यादवला गोलंदाजीला आणत दोन्ही बाजूंनी फिरकीपटूंचं आक्रमण सुरू केलं. कुलदीपने सातत्याने चांगल्या लाईन लेंग्थवर गोलंदाजी केल्याचं फळ त्याला विकेटच्या रूपात मिळालं.
कुलदीप यादव सामन्यातील १७वं षटक टाकण्यासाठी आला. कुलदीपचा चेंडू कामिंदू मेंडिसने फुल लेग्गीत रूपांतरित करत ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत थोडा उंच गेल्याने तो थेट गिलच्या दिशेने गेला. गिलची सुरूवातीपासून नजर चेंडूवर खिळलेली होती. चेंडू जमिनीकडे झुकत असतानाही गिलने डाव्या हाताने अप्रतिम झेल घेतला. गिलने सुरूवातीला दोन्ही हातांनी चेंडू टिपण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू एका दिशेने जाता दिसल्याने गिलने डावीकडे झेप घेत एका हाताने चेंडू टिपला आणि मैदानावर पडताना त्याने हाताचा कोपर मैदानावर टेकत चेंडू हातातून निसटू दिला नाही.
झेल घेतल्यानंतर गिलचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने चेंडू हवेत उडवत जल्लोष केला आणि हात वर करत हवेत ठोसा मारत आपला आनंद व्यक्त केला. कर्णधार गिलचा हा अफलातून झेल पाहून श्रीलंकन चाहतेही अवाक् झाले. शुबमन गिलच्या या कॅचचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय शुबमन गिलच्या झेल टिपतानाच्या अॅक्शनचे विविध फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
तिसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक होईपर्यंत श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. श्रीलंकेने पहिल्या सत्रात ५ विकेट्स गमावत ९९ धावा केल्या आहेत. भारताकडून मानव सुथारने २ तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या आहेत.
