Shubman Gill Press Conference: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉलच्या मैदानावर खेळवला जाईल. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला ही मालिका जिंकून आघाडी घेण्याची संधी असणार आहे. यासह भारतीय संघाचा हा ६०० कसोटी सामना असणार आहे. या ऐतिहासिक सामन्याआधी कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला? जाणून घ्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खास प्लॅन
भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. ही मालिका जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत वर जाऊ शकतो. दरम्यान सामन्याच्या एक दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शुबमन गिल म्हणाला, “कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळताना आता मला कसलाही दबाव जाणवत नाही. आमचं एकच लक्ष आहे, ते म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत टिकून राहणं. त्यासाठी आम्हाला ६ किंवा ७ कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. त्याची सुरुवात आम्हाला इथून करायची आहे.”
हा भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ६०० वा कसोटी सामना असणार आहे. या ऐतिहासिक सामन्यात गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याबाबत बोलताना गिल म्हणाला, “६०० व्या कसोटी सामन्यात देशाचं नेतृत्व करणं ही अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ६०० व्या कसोटीत भारतीय संघाचं नेतृत्व करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
हा सामना गॉलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हे मैदान फिरकी गोलंदाजीसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळू शकतो. आधी फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार होता. पण गेल्या काही वर्षांत भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांचा सामना करताना संघर्ष करताना दिसून आले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला जर ही मालिका जिंकायची असेल, तर फिरकी गोलंदाजांना चांगल्याप्रकारे खेळून काढावं लागणार आहे. भारतीय संघात देखील एकापेक्षा एक स्टार फिरकीपटू आहेत. पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार या फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.
