Shubman Gill Sai Sudharsan Partnership: गुजरात टायटन्स संघाने विक्रमी तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुजरातने राजस्थानवर ७ विकेट्सने शानदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. गुजरातच्या या विजयाचे हिरो ठरले शुबमन गिल व साई सुदर्शन. या दोघांनी २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६७ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. या दीडशतकी भागीदारीसह त्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला.

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी २१५ धावांचं आव्हान दिलं होतं. संघाने हे लक्ष्य १८.४ षटकांत यशस्वीपणे गाठलं. यादरम्यान साई सुदर्शन सलग दुसऱ्या सामन्यात हिट विकेटमुळे बाद झाला. साईने या सामन्यात ३२ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ५८ धावा केल्या. तर शुबमन गिलने ५३ चेंडूत १५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची शतकी खेळी साकारली आणि सामनावीर ठरला.

आयपीएलमध्ये डावाची सुरुवात केल्यापासून शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी उत्कृष्ट ताळमेळ दाखवला आहे. आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सला सहज विजय मिळवून देण्यात गिल आणि सुदर्शन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शतकी भागीदारीमुळे, ते टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक वेळेस शतकी भागीदारी करणारी जोडी ठरले आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या

शुबमन गिल आणि साई सुदर्शन – ११ शतकी भागीदारी (४८ डाव)
विराट कोहली आणि ख्रिस गेल – १० शतकी भागीदारी (६३ डाव)
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान – १० शतकी भागीदारी (७५ डाव)
एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली – १० शतकी भागीदारी (७७ डाव
अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग – ७ शतकी भागीदारी (४४ डाव)
इब्राहिम झाद्रान आणि रहमानुल्ला गुरबाज – ७ शतकी भागीदारी (४९ डाव)

आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम आता शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या नावावर आहे. यापूर्वी हा विक्रम मायकल हसी आणि मुरली विजय यांच्या नावावर होता, ज्यांनी २०११ च्या अंतिम सामन्यात आरसीबीविरुद्ध १५९ धावांची भागीदारी रचली होती. आता शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी मिळून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.