टी-२० मालिकेत न्यूझीलंडला ५-० ने हरवणाऱ्या भारतीय संघाला वन-डे मालिकेत चांगलाच धक्का बसला. ३-० ने वन-डे मालिका जिंकत न्यूझीलंडने टी-२० मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढला. यानंतर भारतीय संघ २१ फेब्रुवारीपासून २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतही भारतीय संघ रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार आहे. त्यामुळे मयांक अग्रवालसोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न निर्माण झाला होता. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने याप्रकरणी आपलं मत नोंदवलं आहे.

“शुभमन गिलला कसोटी संघात स्थान मिळायला हवं. गेले काही सामने त्याला अंतिम संघात स्थान मिळत नाहीये. मयांकने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. तो आता चांगली फलंदाजी करतो. परिस्थितीनुरुप कसा खेळ करायचा हे त्याला माहिती आहे. वन-डे सामन्यातील अपयशाच्या जोरावर त्याला कसोटी संघातून वगळण्याची चूक कोणीही करणार नाही. त्यामुळे माझ्यामते मयांक आणि शुभमन गिलला सलामीला येण्याची संधी मिळायला हवी”, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हरभजन बोलत होता.

न्यूझीलंड अ संघाविरोधातील सराव सामन्यामध्ये शुभमन गिलने आपली चमक दाखवली आहे. सराव सामन्यात गिलने ८३ आणि २०४ धावांची खेळी केली होती. तर दुसरीकडे पृथ्वी शॉ देखील १६ महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमन करतो आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट कोहली आणि रवी शास्त्री कोणाला सलामीसाठी पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.