Shubman Gill Takes Indirect Dig At Sanjay Manjrekar: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला ११ जानेवारीला सुरूवात होणार आहे. नव्या वर्षात रोहित शर्मा व विराट कोहली प्रथमच नव्या वर्षात खेळताना दिसतील. या मालिकेत शुबमन गिल संघाचं नेतृत्त्व करताना दिसेल. या मालिकेपूर्वी शुबमन गिलने पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत उत्तर दिली. यादरम्यान विराट कोहलीवर टीका करणाऱ्या माजी खेळाडूला गिलने सुनावलं आहे.
संजय मांजरेकर यांनी जो रूटचं ४१वं कसोटी शतक पाहिल्यानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर टीका केली होती. कोहलीने इतक्या लवकर कसोटी क्रिकेटमधून बाहेर पडू नये, तर संयम आणि निर्धार दाखवत आपल्या अलीकडील अडचणींवर मात करून पुन्हा सर्वोत्तम फॉर्म गाठायला हवा होता, असं मांजरेकर यांचं मत होतं. मांजरेकरांनी या वक्तव्यादरम्यान विराट कोहली सर्वात सोपा फॉरमॅट म्हणजे एकदिवसीय क्रिकेट खेळत असल्याचं म्हटलं.
भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणताही फॉरमॅट सोपा नसतो, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेआधी तो माध्यमांशी बोलत होता. एकदिवसीय क्रिकेटबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे, गिलने अप्रत्यक्षपणे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यावर टीका केली असल्याची चर्चा रंगली आहे.
शुबमन गिलने वक्तव्यादरम्यान, भारताने २०११ नंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला नाही, यावरून हा फॉरमॅट किती आव्हानात्मक आहे हे स्पष्ट केलं. बाहेरून पाहता एखादा फॉरमॅट सोपा वाटू शकतो, मात्र प्रत्यक्षात कोणताही फॉरमॅट सोपा नसतो. प्रत्येक फॉरमॅटमध्ये कठोर मेहनत, एकाग्रता आणि निर्धार आवश्यक असतो, असंही त्याने यादरम्यान स्पष्ट सांगितलं.
शुबमन गिलने संजय मांजरेकरांच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाला?
“न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या वेळी आम्ही एकदिवसीय सामने खेळलो तेव्हा मी माझं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं आणि तो क्षण मी नेहमीच जपून ठेवतो. कोणताही फॉरमॅट सोपा आहे, असं मला वाटत नाही. भारताने २०११ नंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला नाही, यावरूनच हा फॉरमॅट किती कठीण आहे हे दिसून येतं. बोलायला सोपं असतं, पण प्रत्यक्षात कोणताही फॉरमॅट सोपा नसतो; प्रत्येक फॉरमॅटमध्ये प्रचंड मेहनत आणि ठाम निर्धाराची गरज असते,” असं गिल स्पष्ट म्हणाला.
सध्या टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या तयारी करत आहे. ही मालिका ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी भारतासाठी ही शेवटची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका ठरणार आहे.
