PBKS vs GT, IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेतील चौथा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण गुजरातला अपेक्षेप्रमाणे धावसंख्या उभारता आली नव्हती. कमी धावसंख्या उभारूनही पंजाबचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. शेवटी कुपर कॉनोलीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने हा सामना जिंकला आणि स्पर्धेला दमदार सुरुवात केली.

सामना झाल्यानंतर बोलताना शुबमन गिल म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली, पण शेवटच्या ५-६ षटकात हवी तशी गोलंदाजी झाली नाही. फलंदाजी करत असताना, या विकेटवर २१०-२२० धावा होतील असं वाटलं होतं. पण जर १७५ किंवा १८० धावा जरी केल्या असत्या, तरी निकाल आमच्या बाजूने लागू शकला असता. चेंडू जुना झाल्यानंतर समोर मारणं कठीण होतं. दुसऱ्या डावात पाऊस सुरू होता. चेंडू ओला झाल्याने फलंदाजांसाठी फलंदाजी करणं सोपं होतं.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “मला वाटत नाही की, दुसऱ्या डावात धावांची गती कमी झाली. आम्ही चांगली कामगिरी केली आणि दबाव कायम ठेवला. मी (प्रसिद्धला उशिरा गोलंदाजीला आणण्याचा) विचार करू शकलो असतो. पण तो योग्यवेळी गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने विकेट्स काढून दिल्या. त्याने १७ व्या १८ षटकापर्यंत आम्हाला सामन्यात टिकवून ठेवले.”

तसेच गिलने अशोक शर्माचे कौतुक केले. गिल म्हणाला, “अशोकबद्दल बोलायचं झालं, तर तो आपल्या खेळावर खूप मेहनत घेतो. तो आम्ही शोधलेला एक उत्तम खेळाडू आहे. त्याला पुढे जसजशी संधी मिळेल, तो संघासाठी आणखी चांगली कामगिरी करेल.” या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर ६ गडी बाद १६२ धावांचा डोंगर उभारला. गिलने ३९ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने ३८ धावा केल्या. ग्लेन फिलिप्स २५ धावा करून माघारी परतला. तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जकडून कुपर कॉनोलीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. प्रभसिमरन सिंगने ३७ धावा केल्या. पंजाबने हे आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण करून ३ गडी राखून विजय मिळवला.