IND vs SL Test Series Result Shubman Gill Statement: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटी सामना अनिर्णित राहिला. दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला असला तरी भारताने पहिला कसोटी सामना जिंकत १-० असा विजय मिळवला आहे. मात्र, विजेतेपद मिळवूनही भारतीय संघात काहीशी निराशा आहे; कारण कोलंबोतील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात फॉलोऑन देऊनही त्यांना मालिकेत निर्भेळ विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेनंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.
श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशाने आपल्या दोन शतकांच्या बळावर भारताला विजयापासून रोखलं. सोनल दिनुशाने कोलंबो कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करत भारताच्या गोलंदाजांची शाळा घेतली. पहिल्या डावात २९० धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि श्रीलंका संघाने दुसऱ्या डावात १५४ षटकं फलंदाजी करत नाबाद ४२९ धावा केल्या, परिणामी दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पहिला कसोटी सामना जिंकल्याने भारताने ही मालिका १-०च्या फरकाने जिंकली.
भारताचा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर शुबमन गिल काय म्हणाला?
कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार शुबमन गिल म्हणाला, कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, काहीच नाही. आम्ही जवळपास २५० षटकं सलग तीन दिवस क्षेत्ररक्षण केलं आणि आमच्याकडून जे काही शक्य होतं, ते सर्व केलं. त्यांनीही शानदार फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडे कौशल्य होतंच, त्यासोबतच काही प्रमाणात नशीबही त्यांच्या बाजूने होतं. त्यामुळे आम्ही यापेक्षा वेगळं काही करू शकलो असतो, असं मला वाटत नाही.”
“आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. त्याचबरोबर विरोधी संघाकडूनही शिकण्यासारखं बरंच काही मिळालं. ते ज्या परिस्थितीत होते, त्यांच्यावर प्रचंड दबाव होता आणि त्यातून त्यांनी ज्या पद्धतीने पुनरागमन केलं, ते पाहणं खरंच शानदार होतं. लंच आणि टी-ब्रेकच्या वेळीही आम्ही याबाबत चर्चा करत होतो. आम्ही यापेक्षा वेगळं काही करू शकलो असतो, असं मला वाटत नाही. मात्र, या मालिकेत आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. देवदत्त पदिक्कलने शानदार कामगिरी केली, केएल राहुलनेही चांगली फलंदाजी केली. मानव सुथारने अप्रतिम गोलंदाजी केली. प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावांत शानदार गोलंदाजी करत फलंदाजांना चांगलंच अडचणीत आणलं. त्यामुळे आमच्याकडून जे काही शक्य होतं, ते आम्ही सर्व केलं,” असं शुबमन गिल पुढे म्हणाला.
मानव सुथारच्या गोलंदाजीबाबत गिल म्हणाला, “सुथार सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तो ज्या पद्धतीने चेंडू टाकतो, ते पाहता आगामी काळात तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.”
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याबाबत गिल म्हणाला, “हो, आम्ही नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहोत. त्यामुळे आमच्यासाठी ही एक महत्त्वाची मालिका असेल. त्यानंतर मायदेशातही एक चांगली मालिका आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका आमच्यासाठी चांगली गेली, तर नक्कीच फायदा होईल. जोपर्यंत आमच्याकडे संधी आहे, तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत राहू आणि आशा आहे की आम्ही WTCच्या अंतिम फेरीत पोहोचू.”
फॉलोऑन देण्याचा भारताचा निर्णय योग्य होता का? गिल काय म्हणाला?
“मी म्हटलं त्याप्रमाणे, या सामन्यात त्यांनी अप्रतिम खेळ केला. आता मागे वळून पाहिल्यावर असं वाटू शकतं की, फॉलोऑन देण्याचा निर्णय योग्य होता का? पण हवामान आणि इतर परिस्थिती लक्षात घेता, पाचव्या दिवशी पूर्ण दिवसाचा खेळ होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नव्हती. मात्र, अशा गोष्टींची चर्चा तुम्ही केवळ सामना झाल्यानंतर मागाहून करू शकता. ज्या क्षणी तुम्ही मैदानावर असता, त्या वेळी उपलब्ध परिस्थितीनुसार सर्वोत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न करता. काही गोष्टी आपल्या बाजूने घडल्या नाहीत, पण ते पूर्णपणे ठीक आहे. शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे आणि मला वाटतं, आज अखेरीस कसोटी क्रिकेटच जिंकलं.”
