Shubman Gill post match reaction India vs West Indies 3rd ODI: वेस्ट इंडिजने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, केवळ ४ धावांत दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावूनही भारताने ७ बाद ३५१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तर देताना, वेस्ट इंडीजचा कर्णधार शाई होप याने १६२ धावांची शानदार नाबाद खेळी करत आपल्या संघाला एका अविस्मरणीय विजयाकडे नेलं. भारताच्या या तिसऱ्या वनडे सामन्यातील पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला, जाणून घेऊया.

वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील यशस्वी पाठलाग करून मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. ५ गडी राखून मिळवलेल्या या थरारक विजयासह वेस्ट इंडीजने मालिका १-२ अशी संपवली आणि भारताचे ३-० ने ‘क्लीन स्वीप’ करण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं.

शुबमन गिलचं भारताच्या पराभवानंतर मोठं वक्तव्य

भारताच्या तिसऱ्या वनडे सामन्यातील पराभवानंतर शुबमन गिल म्हणाला, “बऱ्याच गोष्टी योग्य झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही बाबींमध्ये नक्कीच सुधारणा करण्याची गरज आहे. एकूण धावसंख्येबाबत मी खूप समाधानी होतो. सामन्यावर आमचं नियंत्रण होतं, असं मला वाटत होतं. मात्र, स्लो ओव्हर रेटमुळे चार षटकं आम्ही मागे होतो आणि अखेरच्या टप्प्यात त्यांनी सामना आमच्या हातातून हिरावून घेतला. स्लो ओव्हर रेटमुळे षटकांचा प्रश्न आला नसता तर कदाचित सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला असता.”

कुलदीप यादवला गोलंदाजीसाठी लवकर आणण्याचा विचार केला होता का?

गिल म्हणाला, “खरं सांगायचं तर नाही. गुरनूरला क्रॅम्प्स आले होते आणि तो पुन्हा गोलंदाजी करू शकेल की नाही, याची आम्हाला खात्री नव्हती. त्यामुळे थोडी अनिश्चितता होती. सामना अखेरपर्यंत रंगणार, हे आम्हाला माहीत होतं. कुलदीप विकेट घेणारा गोलंदाज आहे आणि त्याची दोन षटकं अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवायची माझी इच्छा होती.”

दुखापती आणि सतत बदलणाऱ्या संघानंतर वनडे संघ म्हणून भारताची प्रगती कशी वाटते?

“मी म्हणेन, आम्ही बर्‍यापैकी समाधानी आहोत. पण मी म्हटलं त्याप्रमाणे अजूनही काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आमचं क्षेत्ररक्षण आणखी चांगलं होऊ शकतं. या संपूर्ण मालिकेत आम्ही जवळपास सहा-सात झेल सोडले, ही चांगली गोष्ट नाहीये, विशेषतः विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने. तुमचं क्षेत्ररक्षण सर्वोत्तम दर्जाचं असणं गरजेचं आहे.”

हेही वाचा

अजून कोणत्या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे?

“डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीमध्येही सुधारणा हवी. अनेकदा आम्ही आक्रमक गोलंदाजी करतोय की बचावात्मक, याबाबतच स्पष्टता नसते, विशेषतः अखेरच्या षटकांमध्ये. समजा एखाद्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे पाच-सहा फलंदाज बाद झाले असतील, तर कोणतं क्षेत्ररक्षण ठेवायचं, डेथ ओव्हर्सची रणनीती लवकर सुरू करायची की अजूनही मधल्या षटकांसारखी गोलंदाजी करायची, याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे या काही बाबींमध्ये आम्हाला नक्कीच सुधारणा करावी लागेल.”

लवकर बाद झाल्यामुळे घरच्या मैदानावर मोठी धावसंख्या उभारण्याची संधी हुकली, याबद्दल काय वाटतं?

“तुम्ही जेव्हा लवकर बाद होता, तेव्हा नेहमीच निराशा होते. पण मला वाटतं, आज ज्या चेंडूवर मी बाद झालो, त्यावर त्यापेक्षा वेगळं काही करता आलं असतं, असं मला वाटत नाही,” असं शुबमन गिलने सांगितलं.