Shubman Gill Statement Galle Test Victory India vs Sri Lanka: भारतीय संघाने श्रीलंकाविरूद्ध गॉल कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात १६५ धावांनी शानदार विजय नोंदवला. या विजयासह मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली. भारतीय संघासाठी हा ६०० वा कसोटी सामना होता, त्यामुळे हा विजय अधिक खास होता. भारताच्या या विजयात मानव सुथार आणि देवदत्त पडिक्कल यांनी विशेष योगदान दिलं. भारताच्या या विजयानंतर कर्णधार शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या.

भारताने गॉल कसोटी १६५ धावांनी जिंकली. भारताने श्रीलंकेसमोर ३७२ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाला केवळ २०६ धावा करता आल्या आणि त्यांना सामना गमवावा लागला. भारतीय संघाने नऊ वर्षांनंतर गॉलमध्ये कसोटी विजय मिळवला आहे; यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये या मैदानावर कसोटी सामना जिंकला होता.

गॉल कसोटीतील भारताच्या विजयात मानव सुथार आणि देवदत्त पडिक्कल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मानव सुथारने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत एकूण १० बळी टिपले; त्याने पहिल्या डावात ४ बळी घेतले आणि दुसऱ्या डावात ६ फलंदाजांना बाद केलं. त्याच वेळी, देवदत्त पडिक्कलने फलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवत सामन्यात एका शतकासह एकूण २११ धावा केल्या.

भारताच्या विजयानंतर कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला?

६००वी कसोटी भारतासाठी खेळताना हा विजय किती खास आहे, यावर शुबमन गिल म्हणाला, हा विजय खूपच शानदार आहे. “आपल्या देशासाठी ६००वी कसोटी जिंकणं खरोखरच विशेष आहे. आमच्यासाठी हा खूप समाधान देणारा विजय आहे. आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण हवामानामुळे सामना सुरू राहील की नाही, याची खात्री नव्हती. त्यामुळे आमच्यावर थोडा दबाव होता. मात्र, संघाने परिस्थितीला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला.”

दुसऱ्या डावातील फलंदाजीतील पडझड चिंतेची बाब आहे का? यावर कॅप्टन म्हणाला, “खरं सांगायचं तर, नाही. आम्ही तिसऱ्या डावात फलंदाजी करताना जवळपास ४०० धावा करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. खेळपट्टीवर मनाप्रमाणे धावा करणं सोपं नव्हतं. त्यामुळे आम्ही तिसऱ्या डावात थोडी अधिक आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात मोठ्या संख्येने षटकं गोलंदाजी करायची होती. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी आपल्याला प्रत्यक्षात किती षटकं गोलंदाजी करता येतील, याची खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नात सुरुवातीलाच काही विकेट्स गमावल्या. मात्र, एकूण पाहता आम्ही तरीही चांगल्या स्थितीत होतो.”

मानव सुथारबद्दल कॅप्टन म्हणाला, “तो अप्रतिम गोलंदाजी करत आहे. भारताकडून अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यातही त्याची कामगिरी शानदार आहे. तो खूपच आश्वासक खेळाडू दिसतो आणि दीर्घकाळ भारतासाठी खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे.”

“त्याची फलंदाजी पाहणं खरोखरच शानदार होतं. शतक करणं महत्त्वाचं असतं, पण शतक पूर्ण केल्यानंतरही त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू ठेवली आणि संघासाठी मोठी धावसंख्या उभारली, यामुळेच सामना अटीतटीचा असण्यापासून संघासाठी सामना जिंकण्याच्या स्थितीत बदलला. दुसऱ्या डावातही त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आणि फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं, ते पाहणं खरोखरच आनंददायी होतं,” असं शुबमन गिल देवदत्त पडिक्कलबद्दल म्हणाला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी हा विजय किती महत्त्वाचा आहे, यावर गिल म्हणाला, “नक्कीच, तेच आमचं अंतिम लक्ष्य आहे आणि त्यासाठीच आम्ही खेळत आहोत. कसोटी सामने जिंकणं सोपं नसतं आणि त्यामुळे हा विजय मिळवणं आमच्यासाठी खूप आनंददायी आहे.”