Shubman Gill On Last Ball Planning: आयपीएल २०२६ स्पर्धेत बुधवारी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. दिलीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात दिल्लीने जवळजवळ विजय मिळवला होता. पण शेवटच्या २ चेंडूंवर सामना फिरला. दिल्लीचा संघ २११ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या धावांचा पाठलाग करताना आधी केएल राहुलने ९२ धावांची खेळी केली. तर शेवटी डेव्हिड मिलरने षटकारांचा पाऊस पाडून नाबाद ४१ धावा केल्या. पण शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर केलेली चूक दिल्लीला महागात पडली. दरम्यान शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना गिल आणि प्रसिध कृष्णा यांच्यात काय चर्चा झाली? याबाबत गिलने खुलासा केला आहे.

शेवटच्या षटकात काय घडलं?

दिल्ली कॅपिटल्सचा संघ २११ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. डेव्हिड मिलरने शेवटपर्यंत सामना खेचला. त्याच्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला मैदान सोडून जावं लागलं होतं. पण शेवटी विकेट्स पडल्यामुळे आणि संघाला गरज असल्यामुळे तो पुन्हा एकदा फलंदाजीला आला. त्याने सिराजच्या १९ व्या षटकात एकूण २३ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात १३ धावा करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवर विपराज निगमने चौकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन डेव्हिड मिलर स्ट्राईकवर आला. चौथ्या चेंडूवर डेव्हिड मिलरने खणखणीत षटकार खेचला. पाचव्या चेंडूवर एक धाव घेण्याची संधी होती, पण त्याने ती धाव घेण्यास नकार दिला. दरम्यान शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना चेंडू निर्धाव राहिला आणि गुजरात टायटन्सने हा सामना एका धावेने जिंकला.

शेवटचा चेंडू टाकण्याआधी काय प्लॅन ठरला?

हा सामना झाल्यानंतर, कर्णधार शुबमन गिलने शेवटच्या चेंडूआधी काय प्लॅन ठरला, याबाबत खुलासा केला. गिल म्हणाला, “आम्हाला वाटत होतं, आम्ही अजूनही जिंकू शकतो. शेवटचा चेंडू टाकण्याआधी आम्ही फक्त यॉर्कर टाकायचा की स्लोव्हर वन यावर चर्चा करत होतो. पण खेळपट्टी ज्या प्रकारे खेळत होती, ते पाहता आम्ही ठरवलं की, जर व्यवस्थित स्लोव्हर चेंडू टाकला, तर त्यावर चौकार मारणं कठीण आहे.” प्रसिधने अचूक टप्प्यावर स्लोव्हर टाकला आणि गुजरातने हा सामना एका धावेने खिशात घातला.