Shubman Gill Catch: धरमशालेच्या मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना रहमानुल्लाह गुरबाजच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. रहमानुल्लाह गुरबाजने तुफान फटकेबाजी करुन अवघ्या ४८ चेंडूंमध्ये दमदार शतकी खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने एकहाती संघाचा डाव सावरला. तर दुसरीकडे कर्णधार शुबमन गिलने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना एका हाताने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून २२ वे षटक टाकण्यासाठी हर्ष दुबे गोलंदाजीला आला. त्यावेळी अफगाणिस्तानकडून अल्लाह गजनफर स्ट्राईकवर होता. डावखुऱ्या हाताच्या हर्षने राऊंड द विकेटचा मारा करत ऑफ स्टंपच्या बाहेरच्या लाईनवर चेंडू टाकला. अल्लाह गजनफरने या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटचा कडा घेऊन वेगाने स्लिपच्या दिशेने गेला. गिलने एका हाताने डाईव्ह मारुन भन्नाट झेल घेतला.
अफगाणिस्तानचा पहिला डाव
या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण अफगाणिस्तानला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. इब्राहिम जादरान १, तर सेदिकुल्लाह अटल ० तर रहमत शाह अवघ्या ३ धावा करुन माघारी परतला. कर्णधार हसमतुल्लाह शाहिदीने २७ धावांचे योगदान दिले. सलामीला आलेल्या रमहमानु्ल्लाह गुरबाजने ५१ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण त्यानंतर रहमानुल्लाह गुरबाजच्या शतकी खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने दमदार पुनरागमन केलं. पण तो बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानला हवा तसा शेवट करता आला नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण डाव २४.५ षटकात १९४ धावांवर आटोपला.
रहमानुल्लाह गुरबाजचं दमदार शतक
या सामन्यात अफगाणिस्तानचे इतर फलंदाज फ्लॉप ठरले, पण रहमानुल्लाह गुरबाजने अफगाणिस्तानची एक बाजू धरुन ठेवली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने दमदार शतकी खेळी केली. हे शतक अफगाणिस्तानसाठी अतिशय खास ठरलं आहे. कारण रहमानुल्लाह गुरबाज हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. ज्यावेळी तो फलंदाजी करत होता, त्यावेळी अफगाणिस्तानचा संघ २०० हून अधिक धावांचा पल्ला गाठणार, असं वाटलं होतं. पण तो बाद होताच धावांची गती कमी झाली.
