What Shubman Gill was Wearing Around His Neck: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभारला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने शुबमन गिल व इशान किशन यांच्या शतकी खेळींच्या बळावर ४०२ धावांचा डोंगर उभारला. शुबमन गिलने तर या सामन्यात दीडशतकी खेळी करत १५४ धावा करत बाद झाला. पण यादरम्यान शुबमन गिलच्या गळ्यातील त्या कपड्याने सर्वांचं लक्ष वेधलं. गिलने गळ्यात नेमकं काय घातलं होतं, जाणून घेऊया.
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने ११० चेंडूंत १५४ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान भारतीय कर्णधाराने अनेक विक्रम आपल्या नावे केले असले, तरी त्याच्या गळ्यातील एका विशिष्ट गोष्टीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याने गळ्यात घातलेली ती गोष्टी नेमकी काय आहे, असा प्रश्न सर्वांना पडला.
लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर फलंदाजी करताना गिलने गळ्यात एक पांढऱ्या रंगाची वस्तू घातली होती, जी सहसा क्रिकेटपटूंच्या अंगावर पाहायला मिळत नाही. नेमकी कोणती वस्तू घातली होती आणि त्याचे फायदे काय आहेत, हे आपण जाणून घेऊया. शुबमन गिलने आपल्या गळ्याभोवती एक विशेष पांढरा टॉवेल गुंडाळला होता, जो शरीर थंड ठेवण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
शुबमन गिलने गळ्यात घातलेल्या टॉवेलचा काय उपयोग आहे?
शतक झळकावल्यानंतर, लखनौमधील उष्णतेमुळे त्याला बरीच कसरत करावी लागत असल्याचं दिसून आलं; त्याला क्रॅम्पसच देखील त्रास होत होता, ज्यामुळे त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. गिल कसाबसा सावरला आणि त्यानंतर त्याने आपल्या मानेभोवती पांढरा टॉवेल गुंडाळला. हा टॉवेल थंड पाण्यात भिजवलेला असतो आणि तो घाम शोषून घेतो; यामुळे मान थंड राहते, ज्यामुळे फलंदाजांना दीर्घकाळ फलंदाजी करणं शक्य होतं. भारतीय हवामानात दीर्घकाळ फलंदाजी करताना याचा वारंवार वापर केला जातो. याला कुलिंग टॉवेल किंवा नेक गेटर असं म्हणतात.
शुबमन गिलला मानेच्या समस्येचा वारंवार त्रास होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीदरम्यान त्याला मानेवर ताण आल्याने ‘रिटायर हर्ट’ व्हावे लागले होते. त्यानंतर आयपीएलमध्येही गिलला याच समस्येचा सामना करावा लागला. दीर्घ खेळीदरम्यान फलंदाजांना अनेकदा अशा समस्यांना सामोरे जावं लागतं; म्हणूनच लखनौमधील एकदिवसीय सामन्यात गिल खबरदारी घेताना दिसून आला.
अफगाणिस्तानविरुद्ध कमालीचं शतक झळकावत गिलने अनेक विक्रम मोडीत काढले. मायदेशात १ हजार एकदिवसीय धावांचा टप्पा सर्वात जलद गाठणारा भारतीय खेळाडू ठरत त्याने केवळ १९ डावांत ही कामगिरी केली; हा विक्रम यापूर्वी विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या नावावर होता. एकदिवसीय सामन्याच्या एका डावात १५० हून अधिक धावा करण्याची शुबमन गिलची ही दुसरी वेळ ठरली असून, या कामगिरीसह त्याने गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
