Michael Clarke On Shubman Gill Captaincy: भारताचा युवा स्टार फलंदाज शुबमन गिल हा भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ही जबाबदारी गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर रोहितनंतर वनडे संघाची जबाबदारी देखील गिलकडे सोपवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या संघात शुबमन गिलला स्थान देण्यात आलेलं नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या मते, आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा झाल्यानंतर शुबमन गिल भारतीय संघात पुनरागमन करू शकतो आणि त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी शुबमन गिलला भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. कारण तो वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे आणि टी-२० संघात डावाची सुरूवात देखील करायचा. पण त्याची सुमार कामगिरी पाहता त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मायकल क्लार्कने गिलला टी-२० संघातून वगळण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. क्लार्कच्या मते, बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटला आगामी टी-२० वर्ल्डकप जिंकायचा आहे, त्यामुळेच अजीत आगरकरांनी हा निर्णय घेतला आहे.
बियाँड २३ क्रिकेट या पॉडकास्टमध्ये बोलताना मायकल क्लार्क म्हणाला की, ” तो (गिल) अजूनही स्पर्धेत असू शकतो. मला वाटतं की, एका ठराविक वेळेपर्यंत संघाची घोषणा करणं गरजेचं होत आणि गिल त्यावेळी फॉर्ममध्ये नव्हता. भारताकडे सलामीवीर फलंदाज म्हणून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या तो संघाचा कर्णधार नाही. त्यामुळे मला वाटतं की, निवडकर्त्यांनी याबाबत आधीच निर्णय घेतला असावा. त्यांना हे सराव सामने पूर्णपणे वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हवे होते. त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच त्यांनी हा निर्णय घेतला.
तसेच तो पुढे म्हणाला की, “वर्ल्डकप झाल्यानंतर तो संघात परतला आणि संघाचा कर्णधार झाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण तो उत्कृष्ट खेळाडू आहे. सध्या तो हवा तसा खेळ करू शकत नाहीये. पण भविष्याचा विचार करता शुबमन गिलबाबत फार काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.” रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. कर्णधार म्हणून हा सूर्यकुमार यादवचा पहिला आणि शेवटचा टी-२० वर्ल्डकप असू शकतो. ही स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
