वृत्तसंस्था, कोलकाता
ऑस्ट्रेलियात मर्यादित षटकांचे सामने खेळून मायदेशी परतलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सोमवारी नेट्समध्ये कसून सराव केला. या ऐच्छिक सराव सत्रासाठी सलामीवीर यशस्वी जैस्वाल, युवा फलंदाज साई सुदर्शन, अष्टपैलू रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी, तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हेसुद्धा उपस्थित होते.
गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना कडवी झुंज मिळणे अपेक्षित आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने काही महिन्यांपूर्वीच जागतिक अजिंक्यपद कसोटी (डब्ल्यूटीसी) स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानातील कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. आता भारताला आव्हान देण्याचे त्यांचे लक्ष्य असून या मालिकेतील सामने कोलकाता (१४ ते १८ नोव्हेंबर) आणि गुवाहाटी (२२ ते २६ नोव्हेंबर) येथे होतील.
पहिल्या कसोटीचे केंद्र असलेल्या ईडन गार्डन्स मैदानावरच भारतीय संघातील काही खेळाडूंनी सरावाला सोमवारपासून सुरुवात केली. नेट्समध्ये फलंदाजी करण्यापूर्वी गिलने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सहाय्यक प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. त्यानंतर गिलने जवळपास दीड तास फलंदाजीचा सराव केला. या वेळी त्याने सुरुवातीला जडेजा आणि वॉशिंग्टन या फिरकीपटूंचा सामना केला. त्यानंतर दुसऱ्या नेटमध्ये जाऊन तो बुमरा, नितीश आणि अन्य स्थानिक क्लबमधील वेगवान गोलंदाजांना सामोरा गेला. मग त्याने थ्रो-डाऊनचाही सामना केला. फलंदाजीनंतर थोडी विश्रांती घेतल्यावर गिलने अन्य सहाकाऱ्यांसह क्षेत्ररक्षणाचा सराव केला. गिल आणि जैस्वाल यांच्यात संवादही झाला. जैस्वालनेही बराच वेळ फलंदाजी केली. या वेळी तो चांगल्या लयीत दिसला.
साई, गंभीरमध्ये संवाद
गिल आणि जैस्वालप्रमाणेच साई सुदर्शननेही बराच वेळ नेट्समध्ये घाम गाळला. डावखुऱ्या साईला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जात आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाचा निर्णय त्याला अद्याप सार्थ ठरवता आलेला नाही. पाच कसोटी सामन्यांच्या नऊ डावांत मिळून त्याला केवळ दोन अर्धशतके करता आली आहेत. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या दोन कसोटींत मिळून त्याला ८४ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याच्यावर दडपण वाढत आहे. साईला ध्रुव जुरेलकडून आव्हान मिळत आहे. सोमवारी साई फलंदाजीचा सराव करताना प्रशिक्षक गंभीरचे त्याच्यावर विशेष लक्ष होते. प्रशिक्षकांनी त्याच्याशी संवाद साधून त्याचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
खेळपट्टीबाबत चर्चा
जवळपास तीन तासांच्या सराव सत्रानंतर कर्णधार शुभमन गिल, प्रशिक्षक गौतम गंभीर, सहाय्यक प्रशिक्षक सितांशू कोटक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीची पाहणी केली. त्यांच्यात आणि येथील खेळपट्टी देखरेखकार (क्युरेटर) सुजन मुखर्जी यांच्यात १५ मिनिटे चर्चाही झाली. त्यांचे हावभाव पाहता, ते खेळपट्टीबाबत फारसे खूश दिसले नाहीत. या खेळपट्टीवर थोड्या प्रमाणात गवत ठेवण्यात आले आहे.
