‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली असताना आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी शुक्रवारी कायदेमंत्री कपिल सिबल यांची भेट घेऊन सामनानिश्चिती विरोधात लवकरात लवकर कठोर कायदा आणण्याची मागणी केली.
‘‘मी आणि जेटली यांनी कायदेमंत्री सिबल यांची भेट घेऊन कठोर कायदा लवकरात लवकर आणण्याची मागणी केली. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हवी. कायद्याच्या अभावाचा फायदा हे लोक घेत आहेत. आम्ही लवकरच क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांचीही भेट घेणार आहोत,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
हे प्रकरण बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या दारापाशी येऊन पोहोचल्यामुळे ते राजीनामा देतील का, असे विचारले असता शुक्ला म्हणाले, ‘‘बीसीसीआयचे रवी सवानी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांना आपला अहवाल सादर करू द्या. त्यानंतर सवानी यांनी बीसीसीआयकडे आपल्या चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर शिस्तपालन समिती योग्य ती कारवाई करेल.’’