डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ बलाढ्य मानला जातो. रणजी करंडक स्पर्धेची ४२ जेतेपदं मुंबईच्या नावावर आहेत. एकेकाळी भारतीय संघात स्थान मिळू शकेल असं म्हटलं जायचं पण मुंबई संघात जागा मिळवणं कठीण मानलं जायचं. लोकलची गर्दी, उष्ण दमट वातावरण, प्रचंड स्पर्धा अशा सगळ्याला पुरुन उरत मुंबईचे क्रिकेटपटू वाटचाल करतात. या परंपरेचा आधुनिक शिलेदार म्हणजे सिद्धेश लाड. कठीण समय येता कोण कामास येतो या उक्तीला जागत सिद्धेश लाड मुंबईचा तारणहार झाला. एकापेक्षा एक दर्जेदार फलंदाजांची मोठी परंपरा असलेल्या मुंबईला सिद्धेशच्या रुपात भक्कम आधारवड लाभला. एक तपाहून अधिक काळ सिद्धेश मुंबईला अडचणीतून बाहेर काढून विजयपथावर न्यायचं काम नेटाने करतो आहे. शांत, संयमी सिद्धेशकडे यंदाच्या हंगामाआधी मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. योगायोग म्हणजे गुरुबंधू शार्दूल ठाकूरकडून कर्णधारापदाची माळ सिद्धेशकडे आली आहे. यानिमित्ताने सिद्धेशच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा.

बोरिवलीतल्या स्वामी विवेकानंद शाळेचा सिद्धेश विद्यार्थी. याच शाळेच्या संघाचे सिद्धेशचे बाबा दिनेश लाड प्रशिक्षक आहेत. सिद्धेश अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळू शकतो हे दिनेश यांच्या लक्षात आलं. यातूनच तो शिवाजी पार्क जिमखाना अकादमीत भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांच्या मार्गदर्शनात खेळू लागला. बोरिवली ते शिवाजी पार्क व्हाया लोकल असा प्रवास सुरू झाला. लहान वयात प्रचंड गर्दीत किटबॅगसह प्रवास करणं कठीण असतं. सिद्धेशने हे करून दाखवलं. सिद्धेशला मुंबईचं प्रतिनिधित्व करायचं होतं. मुंबईसाठी चांगलं खेळून भारतासाठी खेळायचं सिद्धेशचं स्वप्न होतं.वयोगट स्पर्धांमध्ये स्वत:ला सिद्ध करत सिद्धेशने मुंबईसाठी २०१३ मध्ये पदार्पण केलं. त्यावेळी मुंबईच्या संघात वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, झहीर खान असे अनुभवी खेळाडू होते.

काही हंगांमानंतर बंगळुरूच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर मुंबईची स्थिती ६१/४ अशी होती. सिद्धेशकडेही मोठा अनुभव नव्हता पण त्याने खेळपट्टीचा रागरंग ओळखला. तळाच्या फलंदाजांच्या साथीने त्याने किल्ला लढवला. सिद्धेशने त्या डावात ९३ धावांची खेळी केली. या खेळीने सिद्धेश काय करू शकतो याचा प्रत्यय संघव्यवस्थापन, निवडसमिती, संघातले सहकारी-प्रतिस्पर्धी आणि चाहत्यांना आला. दोन हंगांमानंतर तामिळनाडूविरुद्ध खेळताना मुंबईची अवस्था ५२/५ अशी झाली होती. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सिद्धेशने तळाच्या मंडळींना हाताशी घेत दीडशे धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. सिद्धेशच्या खेळीमुळेच मुंबईने फॉलोऑन टाळला. दुसऱ्या डावात मुंबईने तामिळनाडूचा डाव ९५ धावांतच गुंडाळला. चौथ्या डावात मुंबईने २३६ धावांचा यशस्वी पाठलाग करत शानदार विजय मिळवला.

२०१६ मध्ये पुणे इथे झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिद्धेशने ८८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना २३५ धावा केल्या. श्रेयस अय्यरने शतकी खेळी साकारली. सिद्धेशने तळाच्या फलंदाजांच्या बरोबरीने भागीदारी साकारल्या. मुंबईने ३७१ धावा करत बढत मिळवली. सौराष्ट्रचा दुसरा डाव ११५ धावांतच आटोपला आणि मुंबईने डावाच्या फरकाने सामना जिंकत रणजी जेतेपदावर कब्जा केला. शतकी खेळीसाठी श्रेयसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण सिद्धेशच्या खेळीचं मोल दुर्लक्षून चालणार नाही.

त्यानंतर सिद्धेश भारत अ संघाकडूनही खेळला. एका हंगामात धवल कुलकर्णी दुखापतग्रस्त झाल्याने सिद्धेशकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र ती कायमस्वरुपी नियुक्ती नव्हती. २०१९-२० मध्ये त्याच्या कामगिरीत घट झाल्याने त्याला मुंबईच्या संघातून वगळण्यात आलं. २०२२-३ हंगामात तो गोवा संघाकडून खेळला. मात्र वर्षभरातच त्याला मुंबईकडून खेळणंच योग्य राहील हे त्याच्या लक्षात आवं. घरवापसी करता येते मात्र त्यासाठी वर्षभराचा कूलिंग ऑफ पीरियड असतो. या काळात मैदान क्रिकेट खेळता येतं. पण मुख्य संघासाठी निवड होत नाही. सिद्धेशने तो कालावधी पूर्ण केला आणि पुन्हा एकदा मुंबईकडून खेळायला सुरुवात केली. २०२५-२६ हंगामात मुंबईचा संघ जेतेपदापासून दूर राहिला पण सिद्धेशने मुंबईतर्फे सर्वाधिक धावा केल्या.

२०१८ मध्ये मुंबईची रेल्वेविरुद्ध लढत होती. राजधानी दिल्लीतल्या कर्नेल सिंग स्टेडियमवर झालेली ही लढत बापलेकाच्या जुगलबंदीमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सिद्धेश मुंबईकडून खेळत होता तर त्याचे बाबा दिनेश लाड रेल्वे संघाचे सल्लागार निरीक्षक म्हणून कोचिंग टीमचा भाग होते. सिद्धेशने ९९ धावांची खेळी साकारली. सिद्धेश पत्रकारांशी बोलत असताना रेल्वेचे सल्लागार प्रशिक्षक दिनेश लाड खेळाडूंना प्रोत्साहित करत होते. ‘वडिलांकडूनच क्रिकेटचे बारकावे शिकलो. लोकल प्रवासाची सवय त्यांनी लावली. ते एरव्ही माझे सामने पाहायला येत नाहीत. आता ते रेल्वे संघाच्या कोचिंग टीमचा भाग आहेत. यानिमित्ताने माझा खेळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिला याचा आनंद आहे. वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघासाठी खेळायचं हे तत्व त्यांनीच बिंबवलं. शतक हुकलं याचं वाईट वाटलं पण संघ जिंकला याचं समाधान आहे’, असं सिद्धेश म्हणाला होता.

३४वर्षीय सिद्धेशच्या नावावर ८२ सामन्यात ४४.२७च्या सरासरीने ५६२३ धावा आहेत. यामध्ये १५ शतकं आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईचा संघ अडचणीत असताना सिद्धेशने सातत्याने संघाला संकटातून बाहेर काढलं आहे. याच गुणकौशल्याची दखल घेत निवडसमितीने सिद्धेशकडे मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबई क्रिकेटला नेहमीच कणखर नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. हा वारसा सिद्धेश सुरू ठेवेल याची खात्री चाहत्यांना वाटते. सिद्धेशच्या वडिलांच्या मार्गदर्शनात रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर घडले. एकाच घरात दोन वेगवेगळ्या पिढीतील क्रिकेटपटूंनी जपलेली क्रिकेटरुपी मशाल कौतुकास्पद आहे.

आयपीएलमध्ये तब्बल पाच वर्षानंतर पर्दापणाची संधी

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेले खेळाडू आयपीएलमध्ये दिसतात पण सिद्धेश याबाबतीत अपवाद आहे. सिद्धेश २०१५ ते २०१९ या कालावधीत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. २०१९ मध्ये त्याला अखेर पदार्पणाची संधी मिळाली. १० एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियम इथे झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने १९७ धावांची मजल मारली. केएल राहुलने ६ चौकार आणि ६ चौकारांनिशी नाबाद १०० धावांची खेळी केली. ख्रिस गेलने ६३ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या जोडीने ११६ धावांची दमदार सलामाी दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईने कायरेन पोलार्डच्या ८३ धावांच्या खेळीच्या बळावर ३ विकेट्सनी सामना जिंकला. मित्र रोहित शर्माऐवजी संधी मिळालेल्या सिद्धेशने १५ धावांची खेळी केली. सिद्धेशने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत दिमाखात सुरुवात केली. अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर सिद्धेशने षटकार आणि पाठोपाठ चौकार लगावला. मात्र यानंतर सिद्धेशला पुन्हा संधीच मिळाली नाही. रोहित शर्मानेच सिद्धेशला मुंबईची कॅप दिली होती. माझ्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं भावुक झालेल्या सिद्धेशने म्हटलं होतं.