Sikandar Raza Son Eesa Butt Record 279 Runs: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक क्रिकेटपटूंचे लेक क्रिकेटच्या मैदानावर उतरले आहेत. वडिलांप्रमाणे लेकही क्रिकेटचे धडे गिरवत देशांतर्गत क्रिकेट व लीगमध्ये आपलं नाव गाजवत आहेत. अशाच एका क्रिकेटपटूच्य १३ वर्षांच्या मुलाने २७९ धावांची वादळी खेळी केली, ज्याचं नाव ईसा बट असं आहे. त्याच्या या खेळीच्या आकडेवारीने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण हा ईसा बट नेमका कोण आहे, जाणून घेऊया.

१३ वर्षांच्या इसा बट याने १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. सीबीसी (CBC) विरुद्धच्या सामन्यात हेलेनिक अकादमीकडून खेळताना त्याने अवघ्या १४६ चेंडूंमध्ये शानदार २७९ धावा केल्या. १९१.१० च्या स्ट्राईक रेटने खेळल्या गेलेल्या या खेळीत त्याने २० षटकार आणि ३० चौकार लगावले. ईसा बट हा झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझाचा लेक आहे. त्याने २० षटकारांसह केलेल्या २७९ धावांच्या खेळीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

सिकंदर रझाच्या मुलाने शालेय क्रिकेटमध्ये १९१.१० च्या स्ट्राईक रेटसह २७९ धावांची खेळी केली, जी झिम्बाब्वेच्या शालेय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. ‘हेलेनिक ॲकॅडमी’च्या १४-वर्षांखालील (U14) संघाकडून खेळताना मुहम्मद ईसा बट याने चौकार-षटकारांचा जणू पाऊस पाडला. त्याच्या या खेळीमुळे संघाला ५० षटकांत ६ बाद ५१८ धावांचा डोंगर उभारता आला. याला प्रत्युत्तर देताना ‘सीबीसी’ (CBC) च्या १४-वर्षांखालील संघाला १७.१ षटकांत केवळ ८५ धावाच करता आल्या, परिणामी ‘हेलेनिक ॲकॅडमी’ने ४३३ धावांनी सर्वात मोठा विजय मिळवला.

सिकंदर रझा ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघाचं नेतृत्व करतो, त्याचप्रमाणे ईसा बट त्याच्या ‘हेलेनिक अकादमी’ या संघाचे नेतृत्व करतो. कर्णधारपदासह ईसा यष्टिरक्षकही आहे; याचा अर्थ असा की, अष्टपैलू खेळाडू असलेल्या आपल्या वडिलांप्रमाणेच तो देखील अनेक कौशल्य असलेला खेळाडू आहे.

ईसा बट त्याचे वडील सिकंदर रझाला आपला आदर्श मानतो. तसेच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि बाबर आझम हे त्याचे आवडते क्रिकेटपटू आहेत. एका मुलाखतीत ईसा बट याने आपल्या वडिलांसह सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली. ईसा बटच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील वयाने मोठे होत आहेत आणि निवृत्तीच्या जवळ पोहोचले आहेत. त्याला अशी आशा आहे की, तो १८ वर्षांचा होईपर्यंत त्याचे वडील किमान एक क्रिकेट फॉरमॅट तरी खेळणं सुरू ठेवतील. ईसा बटची अशी इच्छा आहे की, त्याला आपल्या वडिलांबरोबर एखादा सामना खेळावा आणि त्यानंतर त्यांनी निवृत्ती घ्यावी.