पीटीआय, बर्मिगहॅम : महाराष्ट्राचा युवा वेटलिफ्टिंगपटू संकेत सरगरने शनिवारी पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक कमावताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील भारताचे खाते उघडले. संकेत सुवर्णपदकासाठी कडवा दावेदार मानला जात होता, परंतु क्लीन अँड जर्कमध्ये १३९ किलो वजन उचलताना उजव्या हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याच्या दुखापतीचे स्वरूप काही चाचण्यांनंतर स्पष्ट होऊ शकेल.

२१ वर्षीय संकेतने एकूण २४८ किलो (११३ किलो + १३५ किलो) वजन उचलले. फक्त एक किलोच्या फरकाने संकेतला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मलेशियाच्या मोहम्मद अनिकने एकूण २४९ किलो (१०७ किलो + १४२ किलो) वजन उचलत स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक कमावले. एकूण २२५ किलो (१०५ किलो + १२० किलो) वजन उचलणाऱ्या श्रीलंकेच्या दिलंका इसुरू कुमाराला कांस्यपदक मिळाले.

‘‘उत्तेजक चाचणीनंतर मी क्ष-किरण चाचणीला सामोरा जाईन. त्यानंतरच दुखापतीचे स्वरूप समजू शकेल. सध्या मात्र मला वेदना होत आहेत,’’ असे संकेतने सांगितले. संकेतच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले.

स्वातंत्र्यसैनिकांना पदक समर्पित!

  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मी माझे पदक समर्पित करतो, असे संकेतने सांगितले.
  • ‘‘घरी परतेन, तेव्हा सर्वानाच आनंद होईल. परंतु सुवर्णपदक गमावल्यामुळे मी निराश झालो आहे. अधिक ताकदीने पुनरागमन करीन,’’ असा विश्वास संकेतने व्यक्त केला.
  • ‘‘वजन उचलताना कोणतीही चूक केली नव्हती. परंतु उजव्या हाताच्या कोपरावरील ताण वाढत असल्याची जाणीव झाली. परंतु मला नियंत्रण राखण्यात अपयश आले. परिणामी ही दुखापत झाली,’’ असे संकेतने सांगितले.
  • ‘‘सरावात मी क्लीन अँड जर्क प्रकारात १४३ किलो वजन सहज उचलायचो. त्यामुळे सुवर्णपदकाची खात्री होती. गेली चार वर्षे मी फक्त सुवर्णपदकाच्याच ईर्षेने सराव करायचो. त्यामुळे हा निकाल मला समाधान देणारा नक्कीच नव्हता,’’ असे संकेत म्हणाला.
  • ‘‘रौप्यपदकाचा आनंद झाला असला तरी याहून अधिक कामगिरी करू शकलो असतो, अखेरीस वजन उचलण्याची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे राष्ट्रीय विक्रमाच्या पलीकडे जोखीम पत्करली नाही,’’ असे संकेतने स्पष्टीकरण दिले.

जलतरण

श्रीहरी अंतिम फेरीत

भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनने पुरुषांच्या बॅकस्ट्रोक प्रकाराच्या उपांत्य फेरीत ५४:५५ सेकंद वेळ नोंदवत अंतिम फेरी गाठली आहे. २१ वर्षीय श्रीहरी आपल्या शर्यतीत चौथा आणि एकंदर सातवा आला. या स्पर्धा प्रकाराची अंतिम फेरी रविवारी होणार आहे.

ल्लपुरुषांच्या २०० मीटर फ्रीस्टाइल प्रकाराच्या शर्यतीत कुशाग्र रावतला अखेरचे स्थान मिळाले. त्याने १:५४.५६ सेकंद वेळ नोंदवली.

बॅडमिंटन

भारतीय संघ बाद फेरीत

भारतीय बॅडमिंटनपटूंनी दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करीत अ-गटातील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर ३-० अशा वर्चस्वपूर्ण विजयासह मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेची बाद फेरी गाठली. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी जोडीने सचिन डायस आणि थिलिनी हेंडाहेवा जोडीला २१-१४, २१-९ असे नामोहरम केले. मग जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीत अनुभवी निलुका करुनाटनेचा २१-१८, २१-५ असा पराभव केला. दुसऱ्या एकेरीत आकर्षी कश्यपने सुहासिनी विदानागेवर २१-३, २१-९ असा विजय मिळवला.

जिम्नॅस्टिक्स

योगेश्वर अंतिम फेरीत

पुरुषांच्या जिम्नॅस्टिक्समध्ये योगेश्वर सिंग या भारताच्या एकमेव खेळाडूने अंतिम फेरीत मजल मारली. सैफ तांबोली आणि सत्यजित मोंडल यांचे आव्हान थोडक्यात संपुष्टात आले. हरयाणाच्या २५ वर्षीय योगेश्वरने एकूण ७३.६०० गुणांसह १६वे स्थान मिळवले.

टेबल टेनिस

महिला संघाची विजयी घोडदौड

मनिका बत्राच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना गयानावर ३-० असा विजय मिळवला. श्रीजा अकुला आणि रीथ टेन्निसन जोडीने नताली किमग्ज आणि चेल्सीआ एडघिल जोडीचा ११-५, ११-७, ११-७ असा पराभव केला. मनिकाने एकेरीत थुरैना थॉमसला ११-१, ११-३, ११-३ असे हरवले. तर दुसऱ्या एकेरीत रीथने चेल्सीआला ११-७, १४-१२, १३-११ असे पराभूत केले.

अ‍ॅथलेटिक्स

मॅरेथॉनमध्ये नितेंद्र १२वा

भारताच्या नितेंद्र सिंग रावतला पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत १२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ३५ वर्षीय रावतने दोन तास, १९ मिनिटे, २२ सेकंद वेळ नोंदवली. युगांडाच्या व्हिक्टर किपलँगटने (२:१०.५५) सुवर्णपदक पटकावले.