४ कोटी रुपये, नोकरी, गावात स्टेडियम आणि राज्यात कुठेही…; हरयाणा सरकारकडून रौप्यपदक विजेत्या दहियावर बक्षिसांचा वर्षाव

रवीने ऑलिम्पिक पदक जिंकावं म्हणून त्याच्या गावातील लोकही देव पाण्यात ठेऊन बसले होते. रवीच्या या रौप्यपदकामुळे गावाचेही नशीब पालटणार आहे.

Ravi Kumar Dahiya
रवी कुमार दहियाच्या गावाला होणार या पदकाचा फायदा (फोटो रॉयटर्सवरुन साभार)

भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय. एक रौप्य आणि तीन कांस्यपदकं जिंकल्यानंतर पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची आशा भारताला होती. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा समाना करावा लागला. रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. मात्र असं असलं तरी रवीने केलेली कामगिरी ही ऐतिहासिक ठरली असून आता त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे. रवीने ऑलिम्पिक पदक जिंकावं म्हणून त्याच्या गावातील लोकही देव पाण्यात ठेऊन बसले होते. रवीच्या या रौप्यपदकामुळे गावाचेही नशीब पालटणार आहे. ४ कोटी रुपये, नोकरी, गावात स्टेडियम आणि राज्यात कुठेही रवीच्या इच्छेप्रमाणे तो सांगेल त्या भागात ५० टक्के सवलतीमध्ये जमीन असा बक्षिसांचा पाऊसच हरयाणा सरकारने आपल्या या सुपुत्रावर पडलाय.

हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातील जवळपास १५ हजार लोकसंख्येचे नाहरी गावातून थेट ऑलिम्पिक पदकापर्यंत झेप घेणाऱ्या रवीला हरयाणा सरकारने आता गावामध्ये कुस्तीचं इनडोअर स्टेडियम बांधून देणार असल्याची घोषणा केलीय. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार रवीला आता क्लास वन कॅटेगरीची सरकारी नोकरीही दिली जाणार आहे. तसेच त्याला हरयाणामध्ये हव्या त्या ठिकाणी ५० टक्के सवलतीमध्ये जमीनही देण्यात येणार आहे. रवीच्या नाहरी गावामध्ये कुस्तीसाठी विशेष इनडोअर स्टेडियम उभारलं जाणार आहे. त्याशिवाय रौप्यपदक विजेत्याला चार कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार असल्याची ऑलिम्पिकपूर्वीच केलेल्या घोषणेनुसार रवीला ही चार कोटींची रक्कमही दिली जाणार आहे.

गावकऱ्यांनाही आशा…

रवीच्या नाहरी गावातील नागरिकांना नेहमीच पिण्याच्या पाण्यासाठी धडपडायला लागते. दिवसभरात दोन तास वीजपुरवठा होतो, त्यात सर्व कामे उरकावी लागतात. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठीही योग्य व्यवस्था येथे नाही. गावात फक्त महत्त्वाचे असे एक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. त्यामुळे रवीने पदक जिंकल्यास गावचे चित्र पालटू शकेल, असं गावकरी ऑलिम्पिकपूर्वी सांगत होते. शांत स्वभावाच्या रवीचे वडील राकेश कुमार दहिया हे शेतकरी आहेत. महावीर सिंग (१९८०-मॉस्को, १९८४-लॉस एंजेलिस) आणि अमित दहिया (लंडन-२०१२) यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा रवी हा तिसरा क्रीडापटू आहे. दोनदा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महावीरला तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांनी ‘तुझी काय इच्छा आहे?’ असे विचारले होते. त्याने मागितल्याप्रमाणे पशुवैद्यकीय रुग्णालय नंतर गावात निर्माण झाले. अशीच आशा आता गावातील लोकांना रवीकडून आहे. रवीच्या या रौप्यपदकांमुळे चार हजार कुटुंबीयाच्या या गावासाठी काही विकास प्रकल्प मागता येतील, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

रवीच्या वडिलांनी एक वर्षांसाठी शेत भाडय़ाने घेतले असून, तिथेच ते कसून मेहनत करतात, परंतु रवीच्या सरावात कधीच खंड पडला नाही. मुलाला योग्य आहार मिळावा, म्हणून दूध आणि लोणी घेऊन राकेश दहिया दररोज छत्रसाल स्टेडियमपर्यंतचे ६० किमी अंतर कापतात. आता गावातच कुस्तीसाठी स्टेडियम तयार होणार असल्याने येथील तरुणांना त्याचा फायदा होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Silver medal winner ravi dahiya will get class 1 category job plot of land indoor wrestling stadium for nahri village and rs 4 cr from haryana government scsg

ताज्या बातम्या