ऑस्ट्रेलिया सध्या सुरू असलेल्या मेलबर्न कसोटीने चौथ्या रंजक वळण घेतले आहे. कसोटीचा निकाल  मंगळवारी लागेलच पण, या कसोटीने युवा फलंदाज विराट कोहली आणि क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर यांच्या खेळीतील समान धागाही या निमित्ताने समोर आला आहे. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल पण, तरीसुद्धा त्यावर नजर टाकणे महत्त्वाचे आहे.
त्याचं झालं असं की, १५ वर्षांपूर्वी सचिनने २८ डिसेंबर १९९९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न स्टेडियमवर आपले ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ५ वे शतक ठोकले होते, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १००० धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनचे वय तेव्हा २६ वर्षांचे होते आणि बॅट देखील ‘एमआरएफ’ची होती. सचिनची ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही १९ वी इनिंग होती. आणि काय योगायोग बघा, आज फक्त फलंदाज बदलला तर बाकी सगळ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा आहेत. विराट कोहलीनेही मेलबर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध २८ डिसेंबर रोजी ५ वे शतक ठोकले. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० धावांचा पल्लाही गाठला. बॅट सुद्धा ‘एमआरएफची’च आणि वय देखील २६ वर्षे. इतकेच नव्हे तर विराटची ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची १९ वी इनिंग! काय मग, आहे ना लक्ष वेधून घेणारा दुर्मिळ योगायोग..