आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनी विजयी सलामी दिली. नुकत्याच झालेल्या सिंगापूर सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतचा अपवाद वगळता अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना झटपट माघारी परतावे लागले होते. मात्र या स्पर्धेत सिंधू, कश्यप, गुरुसाईदत्त यांनी चांगली सुरुवात ही नामुष्की टाळली. दरम्यान, किदम्बी श्रीकांतसह अक्षय देवलकर-प्रज्ञा गद्रे, मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. ही स्पर्धा गिमचेऑन, कोरिया येथे सुरू आहे.
जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असणाऱ्या सिंधूने तासभर चाललेल्या मुकाबल्यात हाँगकाँगच्या चेयुंग गान यीवर २१-१५, १५-२१, २१-१८ असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या हिरोसे इरिकोशी होणार आहे. सिंधूविरुद्ध तिची कामगिरी ३-० अशी आहे.
कश्यपने मलेशियाच्या गोह सुन ह्य़ुआतवर २१-१४, २१-१७ अशी सहज मात केली. गुरुसाईदत्तने चुरशीच्या लढतीत थायलंडच्या फेटप्रदाब खोसितला २२-२०, २३-२१ असे नमवले. ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने सिंगापूरच्या फु मिंगटिआन आणि निओ यु यान वनीसा जोडीवर २१-१८, २१-१५ असा विजय मिळवला.
अन्य लढतींमध्ये माजी विश्वविजेता चीनचा अनुभवी लिन डॅनने श्रीकांतचा २१-७, २१-१४ असा धुव्वा उडवला. मलेशियाच्या लो ज्युआन शेन आणि हेग नेल्सन वेई किट जोडीने मनू अत्री-सुमीत जोडीवर १६-२१, २१-१३, २२-२० अशी मात केली. चीनच्या झांग वेन आणि चेन झोनफु जोडीने अक्षय देवलकर-प्रणव चोप्रा जोडीवर २१-१८, २१-१९ असा विजय मिळवला.