गतविजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपल्या धडाकेबाज कामगिरीची मालिका कायम ठेवत मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
सिंधूने चीनच्या हान ली हिच्यावर २१-१७, १९-२१, २१-१६ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर असलेल्या सिंधूने एक तासाच्या चिवट लढतीनंतर हा सामना जिंकला. याचप्रमाणे पुरुषांमध्ये तिसऱ्या मानांकित प्रणॉयने इंडोनेशियाच्या सोनी द्वि कुनकोरोचा १४ मिनिटांच्या लढतीत २१-१९, २१-१७ असा पराभव केला.
द्वितीय मानांकित सिंधूने स्मॅशिंगचा कल्पकतेने उपयोग केला. तिने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ५-१ अशी आघाडी मिळविली. मात्र हान हिने ही आघाडी ६-५ अशी कमी केली. सिंधूने त्यानंतर जोरकस फटक्यांचा उपयोग करीत आघाडी कायम राखली आणि पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ११-६ अशी आघाडी मिळूनही सिंधूला त्याचा फायदा घेता आला नाही. १७-१७ अशा बरोबरीपर्यंत हा गेम चुरशीने खेळला गेला. हान हिने हा गेम घेत सामन्यात उत्सुकता निर्माण केली.
तिसऱ्या गेममध्ये सिंधू ही सुरुवातीला ३-६ अशा पिछाडीवर होती. मात्र सिंधूने परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करीत १४-८ अशी आघाडी मिळविली. हान हिने तिला गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंधूने खेळावर नियंत्रण ठेवत हा गेम जिंकला.