सिंगापूर : सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला (सुपर ५०० दर्जा) मंगळवारपासून प्रारंभ होणार असून दोन ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांच्यावर पुन्हा भारताची मदार असेल. या स्पर्धेच्या महिला एकेरी गटात सिंधूला तिसरे मानांकन मिळाले आहे. पुरुषांमध्ये अनुभवी किदम्बी श्रीकांतला सातवे मानांकन लाभले असून प्रणॉय बिगरमानांकित खेळाडू म्हणून खेळेल.

सिंधू पहिल्या फेरीत बेल्जियमच्या लिआने टॅनचा सामना करेल. सायना नेहवालचा पहिल्या फेरीत भारताच्याच मालविका बनसोडशी सामना होईल. श्रीकांतचा पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीचा अडथळा ओलांडणाऱ्या खेळाडूशी सामना होईल. प्रणॉयची पहिल्या फेरीत थायलंडच्या सिथ्थिकोम थम्मासिनशी गाठ पडेल, तर पारुपल्ली कश्यप पाचव्या मानांकित जॉनटन ख्रिस्टीशी दोन हात करेल.