पीटीआय, सिंगापूर : भारताच्या पीव्ही सिंधूने शनिवारी जपानच्या सेईना कावाकामीवर वर्चस्वपूर्ण विजय मिळवत सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या सिंधूने जागतिक क्रमवारीत ३८व्या क्रमांकावरील कावाकामीला फक्त ३२ मिनिटांत २१-१५, २१-७ असे पराभूत केले. २७ वर्षीय सिंधूने यंदाच्या वर्षी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्विस खुली अशा ‘अव्वल ३००’ दर्जाच्या दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकही पटकावले आहे. आता पहिल्या ‘अव्वल ५००’ श्रेणीच्या जेतेपदापासून तो एका विजयाच्या अंतरावर आहे.

आता अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूचा आशियाई अजिंक्यपद सुवर्णपदक विजेत्या चीनच्या वांग झि यि हिच्याशी सामना होणार आहे. उबेर चषकामधील रौप्यपदक विजेत्या २२ वर्षीय वांगने जपानच्या ओहोरी अया हिला २१-१४, २१-१४ असे नामोहरम केले. सिंधूचा वांगशी आतापर्यंत एकदाच सामना झाला होता. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेतील त्या सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावरील वांगला नमवले होते. दोन कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद

सिंधूने कावाकामीविरुद्धच्या याआधीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले होते. २०१८च्या चीन खुल्या स्पर्धेत सिंधूचा तिच्याशी अखेरचा सामना झाला होता. चायनीज तैपेईच्या अग्रमानांकित ताय झू यिंगने दुसऱ्या फेरीत माघार घेतल्याने कावाकामीला पुढे चाल देण्यात आली. कावाकामीने २०१९मध्ये आर्लेन्स मास्टर्स स्पर्धा जिंकली होती, तर स्विस खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. यंदा उबेर स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या जपानच्या संघाचीही ती सदस्य होती. कावाकामी गतवर्षी फक्त तीन स्पर्धा खेळली, तर चालू वर्षांतील ही तिची पाचवी स्पर्धा आहे.

  •   वेळ : सकाळी १०.३० वा.
  •   थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१ (संबंधित एचडी वाहिनी)