Gary Sobers Died: वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सर गार्फिल्ड सोबर्स (गॅरी सोबर्स) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. गॅरी यांचे पुत्र डॅनियल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोबर्स यांनी बार्बाडोस येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट इतिहासात सर्वश्रेष्ठ अष्टपैलू म्हणून ओळखले जाणारे गॅरी सोबर्स सहा चेंडूंवर सहा षटकार मारणारे पहिले खेळाडू होते. गॅरी सोबर्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गॅरी सोबर्स यांचे निधन
२८ जुलै, १९३६ रोजी बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या गॅरी सोबर्स यांची प्रतिभावान डावखुरे फलंदाज म्हणून ओळख होती. मध्यमगती, फिरकी गोलंदाज म्हणूनही त्यांनी क्रिकेट विश्वात वेगळी ओळख निर्माण केली होती. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने गॅरी सोबर्स यांचे निधनाचे वृत्त देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विजय मिळवून देण्यात आणि संघासाठी भरीव कामगिरी करण्यात गॅरी सोबर्स यांचे मोठे योगदान आहे.
क्रिकेटमधील कामगिरी
सर गॅरी सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू म्हणून ओळखले जाते. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सोबर्स यांनी ९३ कसोटी सामने खेळताना २६ शतकांसह ५७.७८ च्या सरासरीने ८,०३२ धावा केल्या. गोलंदाजीत देखील त्यांंनी उत्तम कामगिरी केली. सोबर्सनी २३५ बळी घेतले तर, क्षेत्ररक्षणातही उल्लेखनीय कामगिरी करताना १०९ झेल त्यांनी टिपले.
सहा चेंडूंवर सहा षटकार मारणारे पहिले क्रिकेटपटू
सर गॅरी सोबर्स यांनी १९५८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३६५ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यावेळी ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारे सोबर्स पहिले क्रिकेटपटू होते.
१९६८ मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना ग्लॅमॉर्गनविरुद्ध त्यांनी सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते. सोबर्स यांच्या क्रिकेटमधील योगदानाचा योग्य सन्मान करत, २००४ पासून, आयसीसी दरवर्षी सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूला ‘सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी’ दिली जाते.
मान-सन्मान
गॅरी सोबर्स यांनी केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीतूनच संघासाठी योगदान दिले नाही तर, संघाचे कर्णधारपदही भूषवले आणि अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले. क्रिकेटमधील योगदानाबद्दल विस्डेनच्या ‘शतकातील क्रिकेटपटूं’पैकी एक म्हणून त्यांची निवड झाली तसेच आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.
गॅरी सोबर्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक आजी- माजी क्रिकेटपटून सोबर्स यांच्या आठवणींना उजाळा देत तसेच त्यांचा क्रिकेटमधील कामगिरीचा दाखला देत श्रद्धांजली अपर्ण केली आहे.
