वृत्तसंस्था, कोलंबो : भारतीय संघाने गेल्या काही परदेश दौर्यांत सराव सामना खेळण्यापेक्षा नेट्समध्ये घाम गाळण्यास आणि आंतरसंघीय सामने खेळण्यास प्राधान्य दिले होते. मात्र, आता या धोरणात बदल करताना श्रीलंका दौर्यातील कसोटी मालिकेपूर्वी भारताने सराव सामना खेळणे पसंत केले. परदेशातील खेळपट्ट्या आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी प्रत्यक्ष सामन्याचा अनुभव हा केवळ नेट्समधील सरावापेक्षा अधिक मोलाचा असल्याचे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी व्यक्त केले. त्यांचे हे वक्तव्य दिग्गज कसोटीपटू सुनील गावस्कर यांच्या भूमिकेला बळ देणारे आहे.

श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेपूर्वी भारताने गेल्या आठवड्यात तीनदिवसीय सराव सामना खेळला. कोलंबोतील नॉनडे्क्रिरप्ट्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या या सराव सामन्यात भारताने श्रीलंका क्रिकेट एकादश संघाचा पराभव केला. मात्र, अंतिम निकालापेक्षा खेळाडूंना मिळालेला सराव अधिक महत्त्वाचा असल्याचे कोटक यांना वाटते.

‘‘आम्ही केवळ नेट्समध्ये आणखी चार दिवस सराव केला असता, तरी त्याचा या सराव सामन्याइतका फायदा झाला नसता. गोलंदाजांनी चांगल्या तीव्रतेने गोलंदाजी केली, फलंदाजांनाही स्पर्धात्मक पातळीवर खेळता आले. प्रत्येकाला संधी देण्याचा आमचा प्रयत्न होता. गोलंदाजांनीही फलंदाजी केली. आम्हाला येथील परिस्थिती आणि खेळपट्टीचे स्वरूप समजले. त्यामुळे सराव सामना अत्यंत उपयुक्त ठरला,’’ असे कोटक यांनी ‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत सांगितले.या सामन्यात देवदत्त पडिक्कलने नाबाद १४२ धावांची खेळी करताना साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत तिसर्या क्रमांकासाठी आपली दावेदारी भक्कम केली. ‘‘देवदत्तची खेळी खूप चांगली होती. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते विशेष समाधान देणारे होते,’’ असे कोटक म्हणाले.

गावस्करांचा मुद्दा अधोरेखित

कोटक यांचे मत सुनील गावस्कर यांच्या जुन्या भूमिकेला बळ देणारे आहे. परदेश दौर्यांवर प्रत्यक्ष परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सराव सामने खेळणे आवश्यक असल्याचे गावस्कर यांनी सातत्याने सांगितले आहे. २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यातील भारतीय संघाच्या अपयशानंतर गावस्करांनी परदेशातील मालिकेपूर्वी तेथे लवकर पोहोचून प्रथमश्रेणी सामने खेळण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. नेट्समध्ये तांत्रिक तयारी करता येते, पण सामन्यातील दडपण, खेळपट्टीचे स्वरूप, धावांचा पाठलाग आणि गोलंदाजांची प्रत्यक्ष लय याचा अनुभव केवळ सामन्यातूनच मिळतो. विशेषत: नव्या खेळाडूंसाठी असे सामने फायदेशीर ठरतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘पंतला मोकळीक देणे गरजेचे’

  • भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला गेल्या काही काळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. धावांसाठी त्याचा संघर्ष श्रीलंका एकादशविरुद्धच्या सराव सामन्यातही दिसून आला.
  • सराव सामन्याच्या पहिल्या डावात तो बेजबाबदार फटका मारून बाद झाला, तर दुसर्या डावात त्याने आपल्या नैसर्गिक आक्रमक खेळाला बगल देत खेळपट्टीवर टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. पंतसारख्या खेळाडूला मोकळीक देणे गरजेचे असल्याचे मत माजी कसोटीपटू दीप दासगुप्ताने व्यक्त केले आहे.
  • ‘‘संघ व्यवस्थापनाने पंतला आक्रमकपणे खेळण्याची मोकळीक दिली पाहिजे. श्रीलंकेच्या संघात डावखुर्या फिरकी गोलंदाजांची संख्या मोठी आहे. त्यांच्याविरुद्ध डावखुर्या पंतची कामगिरी निर्णायक ठरू शकेल,’’ असे दीप दासगुप्ता म्हणाला.