देशासाठी खेळायला प्राधान्य द्यायचं का क्लबला हा वाद आता चांगलाच तापू लागला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. आरसीबी संघाचा भाग असल्यामुळे बेथेल इंग्लंड संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी वेळेत पोहोचू शकणार नाही हे स्पष्ट झालं.मात्र तो आरसीबीच्या अंतिम अकराचा भाग नव्हता. देशासाठी टेस्ट मॅच खेळायचं सोडून आयपीएलमध्ये बेंचवर बसण्यात काय अर्थ आहे असा सवाल इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने केला. बेथेलने आयपीएल सोडून इंग्लंड संघाला प्राधान्य द्यायला हवं होतं असं परखड मत कुकने मांडलं. अॅलिस्टर कुक, आरसीबी संघाचे डिरेक्टर मो बोबट, विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, माजी खेळाडू डेव्हिड लॉईड तसंच फिल टफनेल यांच्यासह द ओव्हरलॅप क्रिकेट युट्यूब चॅनलवरच्या स्टिक टू क्रिकेट पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी उपस्थितांमध्ये देश का क्लब यावरून चांगलीच वादावादी झाली.

इंग्लंड संघाची मालिका न्यूझीलंडविरुद्ध होणार हे बेथेलला ठाऊक होतं. देशासाठी खेळायला प्राधान्य हवं. त्याऐवजी तो आयपीएलमध्ये खेळत राहिला. विशेष म्हणजे आरसीबीच्या अंतिम अकराचा तो भाग नव्हता. मग तिथे थांबण्यात काय अर्थ आहे असा प्रश्न कुकने केला. भारताचा विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक आरसीबीच्या कोअर टीमचा भाग आहे. त्याने कुकला प्रतिवाद करत वेगळा मुद्दा मांडला.

कार्तिक म्हणाला, बेथेल आरसीबीतर्फे करारबद्ध खेळाडू होता. आरसीबीसाठी खेळण्यासाठी त्याला चांगलं मानधन मिळत होतं. अंतिम अकरात होता की नाही हा मुद्दाच नाही. तो संघाचा अविभाज्य भाग होता. खेळण्यासाठी उपलब्ध होता हे महत्त्वाचं. आयपीएलमध्ये खेळपट्टीचा नूर, मैदानाचा आकार, विदेशी खेळाडूंची उपलब्धता, मॅचअप्स हे पाहून अंतिम अकरा निवडले जातात. बेथेल अंतिम संघात नव्हता हे खरं पण तो निवडीसाठी उपलब्ध होता. चांगलं खेळून पैसे कमावण्यात काहीच वाईट नाही. त्याने इंग्लंडऐवजी आयपीएलला प्राधान्य दिलं. अंतिम अकरात नाही म्हणून कराराचा भंग करणार का? संघात घेणार नसाल तर मी मायदेशी परत चाललो असं प्रत्येकजण म्हणेल. मग निवडीसाठी खेळाडूच उपलब्ध असणार नाहीत. आयपीएलमध्ये अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकतात. या नियमामुळे अनेक चांगल्या खेळाडूंना राखीवमध्ये बसावं लागतं. पण त्याला पर्याय नाही.

फिल सॉल्ट विराट कोहलीच्या बरोबरीने सलामीला येणार हे स्पष्ट होतं. बेथेललाही ठाऊक होतं की तो अंतिम अकरात असण्याची शक्यता नाही. पण हे हंगामाच्या आधी ठरत नाही. स्थळकाळ, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. जेव्हा आरसीबीने त्याच्याशी करार केला तेव्हा तो संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल हे स्पष्ट होतं. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी तो उपलब्ध असण्याची शक्यताच नव्हती.

कुकने त्यावर म्हटलं की टेस्ट हा क्रिकेटमधला पारंपरिक प्रकार आहे. तिथे तुमच्या गुणकौशल्यांची कसोटी असते. त्यामुळे या प्रकारात खेळायला मिळणं ही मोठी संधी असते. ती संधी नाकारून आयपीएल खेळत बसायला बेथेलने प्राधान्य दिलं. बेथेल उपलब्ध असता तर तो तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण क्रमांकावर खेळला असता. इंग्लिश क्रिकेट हे आयपीएल किंवा फ्रँचाइजपेक्षा मोठं आहे. आयपीएल ही जगातली सर्वोत्तम टी२० स्पर्धा आहे. पण म्हणून कायम त्याला प्राधान्य देणं योग्य नाही. इंग्लंड संघ एका चांगल्या खेळाडूविना खेळला.

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने बेथेलच्या आयपीएल खेळण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. आयपीएलमध्ये जरी अंतिम अकरात संधी मिळाली नाही तरी खूप शिकायला मिळतं. आरसीबी संघात विराट कोहलीसारखा खेळाडू आहे. त्याचा सराव पाहून, त्याच्याशी प्रत्यक्ष बोलून खूप काही शिकण्यासारखं आहे. ते दोन महिने बेथेलसाठी मोठा ठेवा ठरू शकतात. यासाठी काही टेस्ट मॅचेस तो इंग्लंडसाठी खेळू शकला नाही तर गावभर बभ्रा व्हावा असा विषय नाही. आयपीएल फक्त दोन महिने चालणारी स्पर्धा आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाला आयपीएल कधी असतं याची पूर्ण कल्पना आहे. ते न्यूझीलंडविरुद्धची मालिका अन्य वेळी आयोजित करू शकले असते. बेथेल अत्यंत प्रतिभाखाली युवा खेळाडू आहे. भविष्यात तो इंग्लंडचा कर्णधारही असू शकतो. दोन महिने आयपीएल खेळण्याचा फायदा त्याला इंग्लंडचं प्रतिनिधित्व करतानाही होणार आहे.

२२वर्षीय बेथेलने ९ टेस्ट, २४ वनडे आणि ३६ टी२० सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. उत्तम पदलालित्यासह तंत्रशुद्ध फलंदाजी आणि त्याचबरोबरीने आक्रमक फटकेबाजी हे बेथेलचं वैशिष्ट्य आहे. चपळ क्षेत्ररक्षक असलेला बेथेल उपयुक्त असा फिरकीपटूही आहे. इंग्लंडचा संघ संक्रमण स्थितीत आहे. बेन स्टोक्सने सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. जोस बटलर कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. बाकी अनेक वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली किंवा त्यांना संघातून वगळण्यात आलं आहे. बेथेल इंग्लंड क्रिकेटचं भविष्य असेल असं भाकीत अनेक माजी खेळाडूंनी वर्तवलं आहे. यामुळे बेथेलने इंग्लंडसाठी अधिकाअधिक सामने खेळावेत असं माजी कर्णधार कुकला वाटतं. मात्र देश का क्लब या कळीच्या प्रश्नावर बेथेलेसारखे युवा खेळाडू क्लबची निवड करत आहेत. आयपीएलच्या माध्यमातून दोन महिन्यात वर्षभराची पुंजी खात्यात जमा होत असल्याने बेथेलने इंग्लंडऐवजी आयपीएलची निवड केली होती.

दशकभरापूर्वी इंग्लंडचा स्टार फलंदाज केव्हिन पीटरसनने इंग्लंडऐवजी आयपीएलला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याच्यावर खूप टीका झाली होती. पीटरसनच्या उदाहरणानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएलसाठी एनओसी देणं कमी केलं. यामुळेच इंग्लंडचे अनेक खेळाडू इच्छा असूनही आयपीएलमध्ये खेळू शकले नाहीत. अलीकडच्या काळात इंग्लंडचा वनडे आणि टी२० कर्णधार हॅरी ब्रूकने आयपीएल लिलावासाठी नाव नोंदवलं. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला ताफ्यात घेतलंही मात्र इंग्लंडचे सामने अर्थात वर्कलोड लक्षात घेऊन ब्रूकने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ब्रूक दिल्ली संघाच्या योजनांचा भाग होता. मात्र त्याने आयत्यावेळी माघार घेतल्याने त्यांना सगळे डावपेच नव्याने तयार करावे लागले. याप्रकाराने नाराज झालेल्या बीसीसीआयने ब्रूकवर दोन वर्षाची बंदीची कारवाई केली. ब्रूकचा सहकारी बेन डकेटलाही दिल्लीच्या संघाने संघात घेतलं होतं मात्र वर्कलोड लक्षात घेऊन डकेटने माघार घेतली.

एकीकडे वेस्ट इंडिजच्या धर्तीवर न्यूझीलंडचे अनेक क्रिकेटपटू फ्रीलान्स होत असताना इंग्लंडचे क्रिकेटपटू मात्र क्लब का देश या कोंडीत सापडले आहेत. न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंनी बोर्डाबरोबर पूर्णवेळेचा करार केलेला नाही. ते जेव्हा निवडीसाठी उपलब्ध असतात तेव्हा बोर्डाला कल्पना देतात. ३६५ दिवस न्यूझीलंडसाठी खेळण्यासाठी उपलब्ध राहण्याची अट त्यांच्यावर नाही. हे खेळाडू जगभरात सुरू असलेल्या विविध टी२० लीगमध्ये खेळतात. त्यातून वेळ मिळतो तेव्हा न्यूझीलंडसाठी सामने खेळतात. न्यूझीलंड बोर्डानेही खेळाडूंनी टी२० लीगमधल्या संघाला प्राधान्य दिल्याचा मुद्दा मान्य केला आहे.