ब्रिटनचे सहा खेळाडू विलगीकरणात

पुढील ४८ तासांत या खेळाडूंचे दोन्ही करोना चाचणी अहवाल नकारात्मक आले तरच त्यांना सराव करण्याची परवानगी मिळणार आहे.

ऑलिम्पिकनगरी

टोक्यो : टोक्योला जाणाऱ्या विमानातील सहप्रवाशाला करोनाची लागण झाल्याने ब्रिटन ऑलिम्पिक संघातील सहा अव्वल खेळाडू आणि दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना सक्तीच्या विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रेट ब्रिटन संघात तणावाचे वातावरण पसरले आहे.

पुढील ४८ तासांत या खेळाडूंचे दोन्ही करोना चाचणी अहवाल नकारात्मक आले तरच त्यांना सराव करण्याची परवानगी मिळणार आहे. योकोहोमा येथे दाखल झाल्यानंतर रविवारी या खेळाडूंनी सरावही केला. पण रविवारी दुपारनंतर ही बातमी समजल्यानंतर अधिकाऱ्यांनी या खेळाडूंना तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्यांच्या खोलीतच स्वयंविलगीकरणात राहण्याचे आदेश दिले.

या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी दिना अशर-स्मिथ, कॅटरिना जॉन्सन-थॉम्प्सन आणि लॉरा मुइर हे अव्वल खेळाडू करोनामुक्त असल्याचे समजते. ब्रिटनचे पथकप्रमुख मार्क इंग्लंड म्हणाले की, ‘‘सहप्रवाशाच्या संपर्कात आल्याचा दोष खेळाडूंना देता येणार नाही. मात्र करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरही अशी घटना घडल्यामुळे आमच्या खेळाडूंसाठी ही निराशाजनक बाब म्हणावी लागेल. विमानतळावर सर्व खेळाडूंचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला होता. त्यानंतर योकोहोमामध्ये दाखल झाल्यानंतरही खेळाडूंची चाचणी नकारात्मक आली होती. आता हे सर्व खेळाडू ब्रिटन वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. या कठीण काळात खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असून ते लवकरच सरावाला प्रारंभ करतील, अशी आशा आहे.’’

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Six british athletes isolating ahead of tokyo olympics zws