Sri Lanka Beat Australia in T20 WC 2026: श्रीलंकेने टी-२० विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मोठा अपसेट केला आहे. श्रीलंकेने ८ विकेट्स आणि २ षटकं राखून चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाचा मानहानीकारक पराभव केला. या दणदणीत विजयासह श्रीलंकेचा संघ सुपर-८ साठी पात्र ठरला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ आता स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंकेच्या विजयाचा हिरो पाथुम निसांका ठरला, ज्याने या रनचेसमध्ये शतक झळकावलं.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेड व मिचेल मार्श यांच्या वादळी खेळीच्या बळावर १८१ धावांची धावसंख्या उभारली, तर प्रत्युत्तरात श्रीलंकेने १८ षटकांत १८४ धावा करत सहज लक्ष्य गाठल. पथुम निसांकाने या यादरम्यान उत्कृष्ट शतक झळकावलं.

पथुम निसाकांंचं शतक ठरलं श्रीलंकेच्या विजयाचं टर्निंग पॉईंट

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवातदेखील चांगली झाली. एका टोकाकडून पथुम निसांका फटकेबाजी करत होता. तर दुसरीकडे कुसल परेरा लवकर झेलबाद झाला. यानंतर कुसल मेंडिस व पथुम निसांका यांनी ९७ धावांची भागीदारी रचली. कुसल मेंडिस ३८ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ६१ धावा केल्या. मेंडिस बाद झाल्यानंतर निसांका व पवन रत्ननायके यांनी ७९ धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. पथुम निसांकाने ५२ चेंडूत १० चौकार व ५ षटकारांसह १०० धावा करत शतक झळकावलं. निसांका हा ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये शतक करणारा पहिला फलंदाज आहे. तर रत्ननायकेने १५ चेंडूत ६ चौकारांसह २८ धावांची खेळी केली.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. १०४ धावांची भागीदारी रचत ट्रॅव्हिस हेड व मिचेल मार्श यांनी संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. मिचेल मार्श दुखापतीनंतर संघात परतला होता. पण त्याने येताच संघासाठी अर्धशतकी खेळी केली. तर ट्रॅव्हिस हेडला देखील सूर गवसला. मिचेल मार्शने २७ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. तर ट्रॅव्हिस हेड २९ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी करत झेलबाद जाला. यानंतर इंग्लिस व मॅक्सवेल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली.

ग्रीन व टीम डेव्हिड ३ आणि ६ धावांवर झेलबाद झाले. तर जोश इंग्लिस २७ धावा आणि ग्लेन मॅक्सवेल २२ धावांवर बाद झाले. यानंतर इतर सर्व फलंदाज झटपट बाद होत माघारी परतले, यासह ऑस्ट्रेलियाने सर्वबाद होत १८१ धावा केल्या. श्रीलंकेकडून दुशान हेमंताने सर्वाधिक ३ विकेट्स तर दुष्मंता चमीराने २ विकेट्स घेतल्या. तर तीक्ष्णा, वेलाल्गे व मेंडिस यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.