Sri lanka beat Oman by 105 Runs in T20 WC 2026: श्रीलंका संघाने टी-२० विश्वचषक २०२६ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत ओमानला पराभूत केलं आहे. श्रीलंका व ओमान यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ मधील पल्लेकले येथे सामना खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने ओमानवर १०५ धावांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २२५ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात ओमानचा संघ २० षटकांत ९ बाद १२० धावाच करू शकला.
श्रीलंकेचा हा टी-२० विश्वचषक २०२६ मधील हा सलग दुसरा विजय आहे. ओमानवर श्रीलंकेने १०५ धावांनी मोठा विजय नोंदवल्यानंतर संघाला गुणतालिकेत नेट रन रेटमध्येदेखील मोठा फायदा होणार आहे. याशिवाय सलग दोन सामने जिंकत संघाने सुपर-८ चा मार्ग सुकर केला आहे. तर ओमान संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे सुपर-८ चं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.
श्रीलंकेने दिलेल्या २२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानची सुरूवात खूप खराब झाली. संघाचा कर्णधार व स्फोटक फलंदाज जतिंदर सिंग १ धाव करत बाद झाला. वसीम अलीने २७ धावांची खेळी केली. तर मोहम्मद नदीमने अर्धशतकी खेळी केली. याशिवाय ओमानचे सर्व फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर फेल झाले. मोहम्मद नदीम शेवटपर्यंत नाबाद राहत त्याने संघासाठी ५६ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ५३ धावांची खेळी केली. नदीमचं हे आंतरराष्ट्रीय इतिहासातील पहिलं अर्धशतक होतं. श्रीलंकेकडून चमीरा व तीक्ष्णा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर वेलाल्गे, मेंडिस, व दुशान हेमंता यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेची वादळी फटकेबाजी
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. ओमानने गोलंदाजीला सुरूवात चांगली केली, पण रत्नायके,कुसल मेंडिस व दासुन शनाका यांनी वादळी फलंदाजी केली. श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद होत माघारी परतले. यानंतर पवन रत्नायकेने २८ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ६० धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर दासुन शनाकाने १९ चेंडूत विक्रमी अर्धशतकी खेळी केली, तर २० चेंडूत त्याने २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा केल्या. तर कुसल मेंडिसने एका टोकाकडून मैदानावर राहत ४५ चेंडूत ७ चौकारांसह ६१धावा करत संघाचा डाव सावरला होता. तर कुसल मेंडिसने १९ धावांची झटपट खेळी करत २२५ धावा केल्या.

