Snake Enters During Live Cricket Match: बांगलादेशचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेने ७७ धावांनी दमदार विजयाची नोंद केली. यासह वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. यादरम्यान काही मिनिटं सामना थांबवावा लागला. यावेळी पाऊस किंवा वादळ आल्यामुळे नव्हे, तर मैदानात साप आल्यामुळे सामना थांबवावा लागला. ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मैदानात घुसला ७ फूट लांब साप

श्रीलंका आणिा बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात अशी घटना घडली, ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सामना सुरू असतानाच अचानक ७ फूट साप मैदानात घुसला. इतका मोठा साप पाहून मैदानात असलेल्या खेळाडूंचा थरकाप उडाला.

या घटनेमुळे सामना काही मिनिटं थांबवावा लागला होता. साप पाहताच ग्राऊंड स्टाफच्या सदस्यांनी मैदानाच्या दिशेने धाव घेतली आणि सापाला मैदानाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. काही मिनिटं सामना थांबल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरूवात झाली. श्रीलंकेत सामना सुरू असताना मैदानात साप येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही लाईव्ह सामन्यादरम्यान सापाने मैदानात प्रवेश केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.

श्रीलंकेचा दमदार विजय

या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. श्रीलंकेला डावाची सुरूवात करताना हवी तशी सुरूवात करता आली नाही. अवघ्या २९ धावसंख्येवर श्रीलंकेचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. खराब सुरूवात झाल्यानंतर कर्णधार असलंकाने दमदार शतकी खेळी केली. त्याने १२३ चेंडूंचा सामना करत १०६ धावांची खेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासह कुशल मेंडिसने ४५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. श्रीलंकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४४ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला बांगलादेशचा संपूर्ण डाव अवघ्या १६७ धावांवर आटोपला . या सामन्यात श्रीलंकेने मोठा विजय मिळवला. यासह श्रीलंकेने हा सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.