पालेकेले : श्रीलंकेविरुद्ध सोमवारी होणारा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे भारतीय महिला संघाचे लक्ष्य आहे. या सामन्यात भारताची सलामीची जोडी स्मृती मानधाना आणि शफाली वर्मा यांच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताने २-१ असा विजय नोंदवला होता. मग पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने चार गडी राखून सरशी साधत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र सलामीवीर स्मृती आणि शफाली यांची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. या दोघींनाही श्रीलंका दौऱ्यावर मोठी खेळी करता आलेली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शफाली ३५, तर स्मृती अवघ्या चार धावांवर बाद झाली. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत त्यांचा कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल.

कर्णधार हरमनप्रीत कौरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४४ धावांसह संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच ट्वेन्टी-२० मालिका आणि पहिला एकदिवसीय सामन्यात संघाच्या गरजेनुसार हरमनप्रीत गोलंदाजीतही निर्णायक कामगिरी केली. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या धिम्या खेळपट्टय़ांवर चमक दाखवली आहे. पहिल्या सामन्यात रेणुका सिंगने श्रीलंकन फलंदाजांना अडचणीत आणले, तर ऑफ-स्पिनर दीप्ती शर्माने प्रभावी मारा केला.

दुसरीकडे, कर्णधार चमारी अटापट्टूकडून श्रीलंकेला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून हसिनी पेरेरा, हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षी डीसिल्वा यांनी मोठी खेळी करणे गरजेचे आहे. गोलंदाजीत डावखुरी फिरकी गोलंदाज इनोका रणवीराचे चमकदार कामगिरी केली. मात्र इतर गोलंदाजांनी तिला साथ देणे आवश्यक आहे.

’ वेळ : सकाळी १० वा.

’ थेट प्रक्षेपण : फॅनकोड अ‍ॅप

स्मृती मानधाना