फुटबॉल वर्ल्डकपमध्ये इंग्लंडसमोर आता मेक्सिकोचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ मेक्सिकोला रवाना होणार आहे. इंग्लंडचा संघ कुठे राहणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. यामागे कारण आहे. काही दिवसांपूर्वीच इक्वेडोर-मेक्सिको लढत झाली. मेक्सिकोच्या समर्थकांनी इक्वेडोर जिंकू नये यासाठी एक अजब युक्ती अवलंबली. इक्वेडोरचा संघ ज्या हॉटेलात थांबला होता त्या परिसरात मेक्सिकोच्या चाहत्यांनी रात्रभर उच्छाद मांडला. लाऊस्पीडकर, हॉर्न आणि बाईक रेझ करून गोंगाट अशा सगळ्या पद्धतीने मेक्सिकोच्या चाहत्यांनी इक्वेडोरसमोर कचकच मांडली.

मैदानावर चांगलं खेळण्यासाठी शांत झोप मिळणे आवश्यक असतं. जेणेकरून मानसिक स्थैर्य मिळतं. मेक्सिकोच्या चाहत्यांनी रात्रभर कचकचाट करत इक्वेडोरच्या खेळाडूंची, सपोर्ट स्टाफची झोपच उडवली. झोप नीट न झाल्याने त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. इक्वेडोरला गाशा गुंडाळावा लागला. इक्वेडोर संघव्यवस्थापनाने वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर फिफाकडे यासंदर्भात औपचारिक तक्रार दाखल केली आहे.

इंग्लंडचा संघ मेक्सिको सिटीत दोन दिवस असणार आहे. इक्वेडोरच्या नशिबी जे आलं ते भोगावं लागू नये म्हणून इंग्लंडने संघ ज्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणाबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे. खेळाडूंना शांत गाढ झोप लागावी यासाठी संघव्यवस्थापनाने स्लीप डिव्हाईसेस मागवली आहेत. शांत झोप लागावी यासाठी काय करायचं याच्या सूचना खेळाडूंना देण्यात आल्या आहेत. ज्या खेळाडूंकडे स्लीप डिव्हाईसेस नाहीत त्यांना व्हाईट नॉईज ऑडियो मशीन्स देण्यात आली आहेत. इअरप्लग्ज, स्लीपबँड अशा गोष्टी मागवण्यात आल्या आहेत जेणेकरून खेळाडूंना सामन्यापूर्वी शांत झोप मिळावी. कोणत्याही गोंगागाचा त्यांना सामना करावा लागता कामा नये.

इंग्लंडच्या संघाने हॅरी केनच्या गोलच्या बळावर काँगोला नमवत राऊंड ऑफ१६ मध्ये प्रवेश केला. मात्र आता त्यांच्यासमोर सहयजमान मेक्सिकोचं आव्हान असणार आहे. मेक्सिकोचा संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे, त्यांना प्रचंड पाठिंबा असणार आहे. त्यामुळे इंग्लंडला पुढची फेरी गाठण्यासाठी प्रयत्नांशी शर्थ करावी लागणार आहे.

इंग्लंड संघाचे व्यवस्थापक थॉमस तुचेल यांनी या सगळ्या उपाययोजनांच्या बरोबरीने नशिबाचीही साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. १९८६ वर्ल्डकपमध्ये याच मैदानावर मॅराडोनाने इंग्लंडविरुद्धच तो प्रसिद्ध हँड ऑफ गॉड गोल केला होता. अर्जेंटिनाच्या विजयासह इंग्लंडला गाशा गुंडाळावा लागला होता. त्या सामन्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्यांदाच या मैदानावर खेळायला उतरतो आहे. तुचेल यांना पत्रकार परिषदेत यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, ‘यावेळी नशीब आम्हाला साथ देईल याची खात्री वाटते. इट्स कर्मा. आता आमची बारी आहे. मॅराडोनाने गाजवलेला तो वर्ल्डकप मला स्पष्ट आठवतो आहे. इंग्लंडविरुद्ध केलेले गोल तर कधीच विसरू शकणार नाही’.

तुचेल आणि इंग्लंड संघासमोर अझटेकाच्या अॅल्टिट्यूडचंही आव्हान आहे. समुद्रसपाटीपासून २,००० मीटर अंतरावर इंग्लंड-मेक्सिको लढत होणार आहे. ‘आम्ही या सामन्यासाठी दोन दिवस आधीच पोहोचणार आहोत. उंचीमुळे इथे चेंडू वेगळ्या पद्धतीने जातो. पाच यार्ड वेगाने चेंडू जातो. त्यामुळे इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं मोठंच आव्हान आहे. भवताल अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आम्ही तिथे लवकर जाणार आहोत. तिथे खेळण्याआधी १० दिवस जा किंवा आयत्याक्षणी जा असं सांगितलं जातं. १० दिवस आधी जाणं शक्य नाही. आयत्या वेळी जाणं अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे आम्ही हाताशी वेळ ठेऊन तिथे पोहोचत आहोत. तिथे खेळलेल्या संघांशी आम्ही बोललो आहोत. आधी जाणं शक्य नसेल तर अगदी आयत्या वेळेला जा असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. या दोन्हीतून सुवर्णमध्ये काढू शकलेलो नाही’, असं प्रशिक्षकांनी सांगितलं.