Smaran Ravichandran Catch Video: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका सुरू असतानाच देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सेमी फायनलचे सामने सुरू आहेत. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना साऊथ झोन आणि नॉर्थ झोन या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना स्मरन रविचंद्रनने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, नॉर्थ झोन संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नॉर्थ झोन संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. सनात सांगवान स्वस्तात माघारी परतला. नॉर्थ झोनकडून अब्दुल समद पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. या डावात तो १९ चेंडूत १६ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी २५ वे षटक टाकण्यासाठी फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल गोलंदाजीला आला.

या षटकातील चौथा चेंडू टप्पा पडताच बाहेर निघाला. या चेंडूवर अब्दुल समदने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये असलेल्या स्मरनच्या हातात गेला. झेल तसा इतका कठीण नव्हता. पण त्याने एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने उजव्या हाताने झेल पकडताना डाईव्ह मारली. पण या प्रयत्नात चेंडू त्याच्या हातून सुटला. पण तोल गेला असतानाही त्याने हवेतच चेंडू पकडला. त्याच्या या झेलचं जोरदार कौतुक होतंय.

या सामन्यात नॉर्थ झोनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेला सनात सांगवान अवघ्या १० धावा करून माघारी परतला. तर आयुष डोसेजाने २३ धावा केल्या. आयुष आणि कामरान इक्बालने अर्धशतकी भागीदारी केली. तर आयुष बदोनी अवघ्या २ धावा करून माघारी परतला. तर कर्णधार कन्हैय्या वाधवान ३६ आणि अब्दुल समद अवघ्या १६ धावा करून माघारी परतला. तसेच कामरान इक्बाल अर्धशतकी खेळी करून नाबाद आहे.